करमाळा प्रतिनिधी


नगर- सोलापूर महामार्गावरील मांगी हद्दीतील टोलनाक्या जवळील पुलावरून जाणाऱ्या वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. याच महामार्गावरून चेन्नई ते दिल्ली कडे रोज शेकडो वाहनांची ये जा होत असते. त्यामध्ये विशेष करून अवजड वाहने, मालवाहतूक ट्रक, मोठे कंटेनर अशा वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. आठवड्यातून एक दोन तरी अपघात या पुलाजवळील वळणावर होत असतात. गेल्या अनेक वर्षात या वळणावर शेकडो अपघात झाले आहेत, कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या पुलाजवळ तीव्र वळण असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यातच वळणाच्या कडेला मोठी झाडे, झुडपे पण आहेत. त्यामुळे समोरून वेगाने येणाऱ्या वाहनाचा विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकाला अंदाज येत नसल्याने समोरा समोर धडक होऊन अनेक अपघात झाले आहेत. दुचाकीस्वराना तर या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अरुंद पूल व आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे पुलावरील खड्ड्यात पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे समोरून एखादे अवजड वाहन आले तर दुचाकी स्वरांची मोठी तारांबळ उडते.
मांगी टोलनाका होता तेव्हा टोल देण्यासाठी मोठ्या वाहनांचा वेग कमी व्हायचा. त्यामुळे पुढे पुलावर पण वाहन सावकाश जात असत.परंतु आता करमाळ्याकडून येणारी वाहने मांगी शिवाराचे हद्दीत तीव्र उतार आसल्यामुळे वेगात येतात व नेमके त्या पुलावरील तीव्र वळणावर अपघात होतात. बहुतांश ट्रक चालक छोटे मोठे वाहन चालक सध्या मोबाईलवर बोलतच ड्रायविंग करताना दिसतात. आर टी ओ चे नियम डावलून वाहन चालवताना दिसतात. मात्र यांचेवर कार्यवाही होणे गरजेचे आहे, वाहन चालवताना मोबाईल वर बोलण्याचे नादात आज रस्ते अपघातात दररोज शेकडो जीव जातात. परंतु याच गांभीर्य वाहनचालकाना नसते, कित्येक वाहनचालक मोबाईल वर बोलताना स्पीड ब्रेकर वर लक्ष न देता वाहन वेगाने पळवतात त्यामुळे पण बरेच अपघात होतात.
सामाजिक कार्यकर्ते:- प्रवीण अवचर
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन मांगी टोलनाक्या जवळील पुलाच्या वळणावरील झाडा झुडपाची छाटणी करावी. जेणेकरून दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना व्यत्यय येणार नाही व अपघातही होणार नाहीत. यामुळे लोकांचे जीवपण वाचतील. अशी मागणी नागरकांमधून केली जात आहे.




