‘या’ शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बिकट; म्हणून…दोन बैलां ऐवजी एका घोड्याकडून केली जातात शेतीची कामे
केम प्रतिनिधी/संजय जाधव


घोडा हा प्राणी आपण नेहमी लग्नामध्ये नवरदेवाची मिरवणूक काढताना पाहतो. तसेच राजेदरबारी व रेससाठी ही घोड्याचा ऊपयोग करतात. पण, करमाळा तालुक्यातील भाळवणी येथील जेष्ठ शेतकरी श्री. रघुनाथ जाधव हे मात्र आर्थिक अडचणींमुळे आपली शेती ही घोड्याच्या सहाय्याने करतात.
रघुनाथ जाधव यांच्याकडे मेंढरांचा कळप होता. त्याच मेंढराच्या कळपा मध्ये एक घोड्याचे शिंगरू होते. ते शिंगरु आता मोठे झाले असून त्याचे नाव राजा ठेवलेले आहे. जाधव यांचा हा राजा चक्क शेतीची सगळी कामे करतो. एकटा राजाला टिपणीला जुंपले असता तो बैलांप्रमानेच पेरणी करतो, खत टाकतो, पाळी घालतो. शेतामधील बैलांची सर्व कामे राजा करतो. असे रघुनाथ जाधव या शेतकऱ्यांने सांगितले आहे.
सध्या पशुधन संपल्यात जमा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते दिवसाला दिड ते दोन हजार रुपये भाडे घेत आहेत. त्यामुळे आम्ही शेतीमधील सर्व कामे ही घोड्याच्या सहाय्याने करत आहोत. त्यामुळे आम्हाला ही शेती परवडत आहे. ज्यावेळेस आम्ही घोडा औताला जुपतो त्यावेळेस येणारी जाणारी लोक कुतूहलाने पाहत बसतात. भाळवणी व परिसरात हा र्चचेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्यांनी बैलजोडी ऐवजी एक शिंगरु घेतले आणि ते मोठे झाल्यावर त्याच्याकडून शेतीची कामे करून घेता येतील असेही शेवटी जाधव या शेतकऱ्यांने सांगितले.




