-->
करमाळासामाजिक

नॅचरल पोटॅश गोळी या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात बनावट पोटॅशची विक्री; रॅकेट उद्ध्वस्त करण्याची करमाळा शिवसेनेची मागणी

 

 

माय मराठी न्युज प्रतिनिधी

नॅचरल पोटॅश, न्यू जय किसान पोटॅश गोळी, इंडियन पोटॅश, सुजला पोटॅश अशा साधर्म्य असलेल्या नावाने पोटॅश गोळी नावाने बनावट खत विकून शेतकऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांची लूट केली जात आहे. या गोळी पोटॅश विकणाऱ्या दुकानदार व निर्माण करणाऱ्या बनावट कंपन्यांवर तात्काळ कृषी विभागाने कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

गोळी पोटॅश या नावाचे कोणतेही खत हे खत नियंत्रण कायद्यात नसून अशा पद्धतीने कोण गोळी पोटॅश विकत असेल तर अशा विक्रेत्यांची नावे शेतकऱ्यांनी कृषी खात्याला कळवावीत.

      देवराव चव्हाण

रमाळा तालुका कृषी अधिकारी

 

मंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोटॅश हे खत बाहेर देशातून आयात होते व हे खत नावाजलेल्या आयपीएल, जय किसान, कोरोमंडल अशा कंपन्या आपल्या पॅकिंग मध्ये विकतात. पोटॅश गोळी या नावाने बाजारात अनेक बनावट कंपन्यांनी हे खत उपलब्ध केले आहे. या खताचे गोणी वर ९५० रुपये विक्री किंमत असून व्यापाऱ्यांना ही गोणी केवळ ३५० रुपयात मिळते. या प्रत्येक गोणी मागे सहाशे रुपये मिळत असल्यामुळे काही व्यापारी ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या गळ्यात मारत आहेत. या गोळी पोटॅश मध्ये फक्त माती असून याचा पिकाला कोणताही फायदा होत नाही. हे खत विकताना शेतकऱ्याला भेसळ डोस मध्ये दिले जाते. त्यामुळे हे खत बनावट असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. ओरिजनल पोटॅश वापरल्यानंतर ऊस पिकाचे एकरी एक ते दोन टन उत्पन्न वाढते. मात्र हेच बनावट पोटॅश वापरले गेल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नात सुद्धा मोठी घट होऊन त्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

 

 

इंडियन पोटॅश लिमिटेड ही कंपनी केंद्र सरकारच्या स्वायत्त मालकीची असून देशातील ८० टक्के पोटॅश आमची कंपनी आयात करते. गोळी पोटॅश नावाचे कोणतेही खत बाजारात उपलब्ध नसून गोळी पोटॅश नावाने कोण जर पोटॅश खत विकत असेल तर हा मोठा गुन्हा आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे. गोळी पोटॅश कुठे उपलब्ध असेल तर अशा ठिकाणांची माहिती आम्हाला कळवली तर आम्ही कंपनीला याची माहिती देऊ. पण कोणीही गोळी पोटॅश खरेदी करू नये.

   संदीप दादासाहेब चव्हाण 

  जिल्हा विक्री अधिकारी

   इंडियन पोटॅश, लिमिटेड

 

गोळी पोटॅश या नावाने पुणे, उस्मानाबाद, नगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यात रोज किमान ५०० टन बोगस खत विकले जात आहे. या बनावट पोटॅशच्या बॅगा अत्यंत आकर्षक असल्यामुळे शेतकरी त्याला बळी पडत आहेत.

केवळ अधिक नफा मिळतो म्हणून बनावट पोटॅश गावोगावी जाऊन थेट शेतकऱ्यांना विकणाऱ्या काही एजंट सुद्धा फिरत आहेत या सर्व प्रकाराला तात्काळ कृषी खात्याने बंधन घालावे. तसेच बनावट गोळी पोटॅश विकणाऱ्या त्यांच्या दुकानातील गोळी पोटॅश चा नमुना प्रयोगशाळेत तपासून कारवाई करावी अशी मागणी महेश चिवटे यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close