महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षीपासून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात भगव्या रंगाची गुढी उभारून छत्रपती शिवरायांच्या आदेश पत्राचे वाचन करण्यात यावे. असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.


तसेच शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची पद्धत व काही नियम ही या आदेशात देण्यात आले आहेत.
नियम:-
१)भगवा स्वराज्य ध्वज संहिता:-
ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटिन असलेली भगवी जरीपताका असावी. ध्वज हा ३ फूट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
२) शिवशक राजदंड स्वराज्य गुढी संहिता:-
शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी १५ फूट उंचीचा वासा किंवा बांबू असावा. त्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळे असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान पाच ते सहा फुटाचा आधार द्यावा.
आवश्यक साहित्य:- सुवर्णकलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षदा, हळद, कुंकू, ध्वनीक्षेपक.
३) ६ जून सकाळी नऊ वाजता:-
शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालत्या करून स्वराज्याचा सार्वभौम व मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख-समृद्धी,समता व स्वातंत्र्य ने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्ण कलश बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी हे अष्टगंधने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत किंवा महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी.
४) सूर्यास्ताला:-
शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घ्यावी भगवा स्वराज्य ध्वज व्यवस्थित घडी घालून ठेवावा.




