पाणी प्रश्नावर शेतकरी आक्रमक; उद्या मांगी येथे टेंभुर्णी-नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी / करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागातील २२ गावांची तहान भागवणाऱ्या मांगी तलावातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयासाठी देण्याच्या शासन निर्णयाविरोधात आता शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवार दि. २२ जून रोजी मांगी येथील बसथांब्याजवळ टेंभुर्णी-नगर महामार्गावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांतील ग्रामपंचायतींनी या निर्णयाविरोधात ठराव मंजूर केले असून, “रक्त सांडायची वेळ आली तरी मांगी तलावातील एक थेंबही बाहेर तालुक्यात जाऊ देणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मते, मांगी तलाव हा पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या ५५ वर्षांत हा तलाव केवळ आठ ते दहा वेळाच ओव्हरफ्लो झाला आहे. साधारण एक टीएमसी क्षमतेचा हा तलाव पावसाळ्यात भरतो; मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडा पडतो. दरवर्षी तलावात केवळ ५० ते ६० टक्के पाणीसाठा जमा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली असून, दोन ते अडीच महिन्यांत तलावातील पाणी संपत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे या भागात दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच मांगी तलाव लाभक्षेत्रासह १२ गावांची बोरगाव पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून बंद असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा किंवा मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून तलावात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. रस्ता रोको आंदोलनासाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेण्यात आली असून, २२ गावांतील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मांगी तलाव पाणी बचाव संघर्ष समितीने केले आहे.
◼ ‘या’ आहेत प्रमुख मागण्या
• मांगी तलावातील पाणी बाहेर नेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
• मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करावा.
• तलावात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्यासाठी योजना राबवावी.
• तलावातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवावी.
• बंद पडलेली बोरगाव पाणीपुरवठा योजना सुरू करावी.



