
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात, करमाळा येथील महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सने आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून एकूण ३०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९९.३५% लागला आहे. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने थेट राज्य क्रमवारीत स्थान मिळवल्याने तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले, असे मत संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्राचार्य बी. के. पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक एम. आर. कांबळे, पर्यवेक्षिका सौ. सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख व्ही. एल. पवार व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संपूर्ण तालुक्यातून या गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहिल्या तीनही क्रमांकात मुलींचेच वर्चस्व…!
महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या निकालात मुलींनी विशेष कामगिरी करत प्रथम तीनही क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. यामध्ये कु. हर्षदा हनुमंत जमदाडे हिने ८७.३३% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच कु. वैभवी उमेश पवार आणि कु. प्रणिती पोपट मोहोळकर यांनी प्रत्येकी ८३.००% गुणांसह द्वितीय, तर कु. स्नेहल भाऊसाहेब शिंदे हिने ८२.३३% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळवून राज्यात प्रथम!
महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थिनी कु. मंगल गोपीनाथ कोंडलकर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून चक्क महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. एका ग्रामीण भागातील मुलीने गणित सारख्या विषयात राज्याच्या यादीत नाव कोरल्याने संपूर्ण तालुक्यात तिचे कौतुक होत आहे. तिच्या या यशामुळे कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



