
करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


सध्या सर्वत्र ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढत असून रोख व्यवहारांपेक्षा मोबाईलद्वारे पैसे पाठविणे, स्वीकारणे आणि विविध देयके भरणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र या सोयीसोबतच चुकीचे व्यवहार, मोबाईल क्रमांक किंवा खाते क्रमांक चुकणे, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. अनेकदा चुकीने दुसऱ्याच्या खात्यात गेलेली रक्कम परत मिळणे कठीण ठरते. अशा परिस्थितीत करमाळ्यातील पंचायत समितीतील महिला कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे.
करमाळा पंचायत समितीतील तालुका अभियान व्यवस्थापक सुषमा विष्णुपंत बिचुकले यांच्या खात्यात अज्ञात व्यक्तीकडून अचानक १६ हजार ८०० रुपये जमा झाले. ही रक्कम कोणाकडून आली याची त्यांना माहिती नव्हती. काही वेळाने नाशिक येथे एका खासगी कंपनीत काम करणारे संज्योत देसाई यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ही रक्कम चुकून त्यांच्या खात्यात गेल्याचे सांगितले. संज्योत देसाई यांना त्यांच्या नातेवाईकांच्या दवाखान्याच्या तातडीच्या खर्चासाठी पैसे पाठवायचे होते. घाईगडबडीत मोबाईल क्रमांक टाकताना एक अंक चुकीचा पडल्याने ही रक्कम संबंधित व्यक्तीकडे न जाता सुषमा बिचुकले यांच्या खात्यात जमा झाली. संबंधित व्यक्तीला पैसे न मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर देसाई यांनी व्यवहाराचा तपशील तपासून चुकीचा मोबाईल क्रमांक शोधला आणि संपर्क साधला.
सुषमा बिचुकले यांनी लगेच पैसे परत न पाठवता प्रथम पूर्ण खात्री करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संबंधित व्यक्तीची ओळख, नातेवाईकांची माहिती, व्यवहाराची वेळ, रकमेचा तपशील याची पडताळणी केली. ही रक्कम खरोखरच संज्योत देसाई यांची असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी रोहित घोलप यांना बोलावून अधिक माहिती घेतली.
दवाखान्याच्या उपचारासाठी ही रक्कम अत्यंत आवश्यक असल्याचे समजल्यावर सुषमा बिचुकले यांनी ती रक्कम पुन्हा ऑनलाईन पद्धतीने संबंधित खात्यात परत केली. चुकून गेलेले पैसे योग्य वेळी परत मिळाल्याने संज्योत देसाई, रोहित घोलप आणि त्यांच्या परिवाराने सुषमा बिचुकले यांचे आभार मानले.
आजच्या काळात अनेकदा चुकून झालेल्या मोबाईल रिचार्जची रक्कमही परत मिळत नाही, तसेच चुकीच्या खात्यात गेलेले पैसे मिळविण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागात शेतकरी, विमाधारक किंवा नुकसानभरपाईच्या रकमांमध्येही अशा चुका घडताना दिसतात. अशा वेळी प्रामाणिकपणे वागून दुसऱ्याची अडचण समजून घेत रक्कम परत करणारी माणसे समाजात विश्वास टिकवून ठेवतात. सुषमा बिचुकले यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणामुळे पंचायत समिती परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
“चुकून आलेली रक्कम परत करणे ही सामाजिक जबाबदारी”
सध्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये अनेकदा मोबाईल क्रमांक, खाते क्रमांक किंवा व्यवहाराची माहिती चुकल्याने पैसे चुकीच्या खात्यात जातात. त्यामुळे संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती, व्यवहाराचा तपशील आणि ओळख निश्चित झाल्यानंतरच रक्कम परत केली. दवाखान्यासाठी तातडीची गरज असल्याचे समजल्यावर संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष ओळख पटवून प्रतिनिधीमार्फत माहिती घेतली आणि खात्री झाल्यानंतर १६ हजार ८०० रुपये परत केले. आजच्या काळात अशा प्रामाणिकतेची समाजाला अधिक गरज आहे.
– सुषमा बिचुकले, तालुका अभियान व्यवस्थापक, पंचायत समिती, करमाळा



