दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने आज व उद्या आंतरराष्ट्रीय परिषद; देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


दत्तकला शिक्षण संस्थेच्या अंतर्गत दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी व दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने “औषधनिर्माण, जीवन आणि न्यायवैद्यक शास्त्रातील नवकल्पना : पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड” (Innovations in Pharmaceutical, Life & Forensic Sciences: Bridging Classical Knowledge with Modern Technologies) या विषयावर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद दि. २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला प्रमुख संरक्षक म्हणून संस्थेच्या सचिव मा. सौ. माया झोळ व संस्थापक-अध्यक्ष मा. प्रा. रामदास झोळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
उद्घाटन समारंभासाठी प्रा. (डॉ.) अतुल कुमार नासा (कार्यकारी समिती सदस्य, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली; प्रो-व्हाइस चान्सलर, एसजीटी विद्यापीठ, गुरुग्राम) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोप समारंभासाठी डॉ. दीपेंद्र सिंह (सेंट्रल कौन्सिल मेंबर, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया; प्राध्यापक, पं. रविशंकर शुक्ला विद्यापीठ, रायपूर) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मलेशिया व भारतातील ख्यातनाम तज्ज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत लाभणार असून, डॉ. चान सिओक यी (युनिव्हर्सिटी सायन्स मलेशिया), डॉ. एनजी क्वोक वेन (QUEST International University, Malaysia), डॉ. विजय कोत्रा, डॉ. रविंदर कोंथम (CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे) आणि डॉ. वेंकटेश्वर राव (VIMTA Labs, हैदराबाद) यांचा सहभाग असणार आहे.
या परिषदेमध्ये प्लेनरी लेक्चर्स, पोस्टर व ओरल प्रेझेंटेशन सत्रे आयोजित करण्यात येणार असून उत्कृष्ट सादरीकरणांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. निवडक संशोधन लेखांना ISBN क्रमांकासह पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात येणार आहे.
ही परिषद इंडियन फार्मसी ग्रॅज्युएट्स असोसिएशन (IPGA), IPGA वेल्फेअर ट्रस्ट, APTI महाराष्ट्र शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (लोनेरे) व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सेतू बांधत संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



