
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची धक्कादायक बातमी समजताच मन अत्यंत व्यथित झाले, अशी भावना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केली आहे. अजितदादा आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध होते. आम्ही दोघेही जवळपास समवयस्क असून आमचा राजकारणातील प्रवेशही एकाच काळात झाला, असे त्यांनी सांगितले.

१९९० साली मी विधानसभेवर तर १९९१ साली अजितदादा लोकसभेवर गेले. त्या काळात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी, जयंत पाटील, सुभाष कुल आदी तरुण नेते एकत्र कार्यरत होतो, अशी आठवण जगताप यांनी करून दिली.
महाराष्ट्र सरकार असो, राज्य सहकारी बँक असो किंवा संपूर्ण सहकार क्षेत्र असो, अजितदादांचा प्रशासनावर जबरदस्त वचक आणि दरारा होता. कार्यकर्त्यांना ताकद देणारा, निर्णयक्षम आणि धाडसी नेता म्हणून त्यांची ओळख होती. अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे कठीण आहे, असेही जगताप म्हणाले.
मी दोन वेळा आमदार असताना, तसेच सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना, राज्य शिखर बँकेच्या माध्यमातून अजितदादांनी केलेली मोलाची मदत करमाळा तालुक्याची जनता कधीही विसरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
पवार कुटुंबीयांच्या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून करमाळा तालुका व जगताप कुटुंबियांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सद्गती देवो, हीच प्रार्थना, असेही माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शेवटी म्हटले आहे.




