
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अंतिम चित्र उमेदवारी माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी एकूण २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ३४ तर पंचायत समितीच्या तब्बल १०२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने अनेक ठिकाणी थेट दुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत.
राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतल्याने निवडणूक लढती अधिक चुरशीच्या होणार असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) कोर्टी गटातील उमेदवार सवितादेवी राजेभोसले व वीट गटातील उमेदवार ऋतुजा शिंदे यांच्यासह केतुर व चिकलठाण या दोन पंचायत समिती गणातील उमेदवारांनीही माघार घेतली आहे.
तालुक्यातील काही प्रमुख जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमधील थेट दोन उमेदवारांमध्येच लढत होत असल्याने मतदारांचे लक्ष याकडे लागले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल व जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), रासप चे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाकडून तर विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली जात आहे.
‘या’ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात थेट दुरंगी लढत
जिल्हा परिषदच्या कोर्टी गटात वनिता गुळवे व योगिनी राजेभोसले यांच्यात, तर वांगी गटात मीनाक्षी देशमुख व रूपाली गोडसे यांच्यात थेट दुरंगी लढत होणार आहे. तसेच पंचायत समितीच्या जेऊर, उमरड व चिकलठाण या गणांमध्ये एकास एक उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे तेथेही सरळ दुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढणार असून राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.



