
करमाळा | प्रतिनिधी माय मराठी न्यूज


भारतीय जनता पार्टीने महायुतीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून संधी दिल्यास निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. चिखलठाण (ता. करमाळा) येथे प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्षानिमित्त आयोजित दिनदर्शिका प्रकाशन व वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपस्थित नागरिकांना दिनदर्शिका वितरित करण्यात आल्या.
दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याने जनतेमध्ये आपुलकीचे व विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. या सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते व नागरिकांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असल्याचे प्रा. झोळ सर यांनी सांगितले.
महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही घटक पक्ष एकत्र असून, जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी एक निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याची ग्वाही ही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
या कार्यक्रमास आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, माजी संचालक शहाजीराव देशमुख, हरिभाऊ मंगवडे, हरिभाऊ झिंजाडे, शेलगावचे माजी सरपंच रायचंद दादा खाडे, कुगावचे दत्तात्रय कामटे, वाशिंबेचे माजी सरपंच अनुरथ दादा झोळ यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते, पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



