-->
करमाळाराजकिय

संजयमामांनी पाच वर्षांत काय काम केले हे सांगण्याऐवजी विद्यमान आमदारांनी एका वर्षात काय केले ते सांगावे–ॲड.अजित विघ्ने

राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांचा पाटील गटाच्या प्रवक्त्यास प्रतिटोला

 

करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ३४९० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून ती प्रत्यक्षात मार्गी लावली आहेत. सत्ता कार्यकाळ संपल्यानंतरही आजही ही कामे सुरू आहेत, यावरूनच त्यांच्या विकासकामांची प्रचिती येते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केले.

 

संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. HAM अंतर्गत विहाळ, पोंधवडी, झरे, कोंढेज, निंभोरे या दुर्लक्षित गावांमधून जाणाऱ्या राजुरी ते वेणेगाव रस्त्यासाठी तब्बल २७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे विघ्ने यांनी सांगितले.

 

डिकसळ पूल, कुगाव–शिरसोडी पूल, आवाटी, राजुरी, रावगाव येथील वीज उपकेंद्रे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत, दहिगाव उपसा सिंचन योजनेची बंद नलिकेद्वारे कामे, कमला भवानी मंदिर विकास, पुरातत्व विभागामार्फत भुईकोट किल्ला दुरुस्ती, तसेच समाजकल्याण, अल्पसंख्यांक व पर्यटन विभागांतर्गत कोट्यवधींची कामे ही संजयमामांच्या विकास कामांची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

याउलट विद्यमान आमदारांनी गेल्या एका वर्षाच्या कालावधीत अर्थसंकल्पातून एकही नवा रुपया मंजूर करून आणलेला नाही. हे अपयश झाकण्यासाठी तहसीलदारांवर हक्कभंग दाखल करणे व जनतेची दिशाभूल करणे अशी संकुचित मानसिकता दाखवली जात असल्याचा आरोप ही ॲड. विघ्ने यांनी केला.

 

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंद नलिकेचे काम खंडणीसाठी रोखून धरणे, जातेगाव–टेंभुर्णी रस्त्याचे काम रखडणे, तहसील कार्यालय इमारतीसाठी आलेला निधी खर्च न करणे, नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांसाठी मंजूर निधी असूनही कामे सुरू न करणे हे विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणाचे उदाहरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संजयमामा शिंदे यांनीे जिल्हा परिषद अध्यक्ष असतानापासून आजपर्यंत करमाळा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे करून जनतेशी आपली नाळ घट्ट जोडली आहे. विधानसभेला व आदिनाथ कारखान्याला मिळालेले वाढते मतदान हे जनतेचा विश्वास दर्शवते. त्यामुळे कितीही वल्गना किंवा आघाड्या झाल्या तरी संजयमामा शिंदे करमाळा तालुक्याच्या कर्मभूमीत कायम राहणार आहेत, असा ठाम विश्वास ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close