-->
करमाळासामाजिक

कुणबी दाखल्यांच्या अडवणुकीविरोधात सकल मराठा समाज आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

कुणबी जात प्रमाणपत्र देताना जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कुर्डूवाडी येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडून कुणबी दाखल्यांच्या प्रकरणांमध्ये अनावश्यक अडथळे आणले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, अर्जदाराने प्रतिज्ञापत्रावर स्वतः सही करून ‘सेल्फ अटेस्टेड’ कागदपत्रे दिली असतानाही ती कारण नसताना नाकारली जात आहेत. कुटुंबातील एका सदस्याच्या प्रकरणाला तहसीलदारांची प्रमाणित प्रत ग्राह्य धरली जात असताना, त्याच कुटुंबातील दुसऱ्या प्रकरणासाठी ओरिजनल कागदपत्रांची मागणी करून अडवणूक केली जात आहे. तसेच कुटुंबामध्ये आधीपासून जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप करण्यात आला.

 

महसुली पुरावे उपलब्ध असतानाही अनावश्यक फेरफार मागवून प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. करमाळा तहसील कार्यालयातून कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाकडे पाठवलेली प्रकरणे त्रुटी दाखवून परत पाठवली जात असल्यास, ती फेरसादर करताना तहसीलदारांची सही घेऊन करमाळ्यातूनच ऑनलाइन करण्याची सुविधा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

 

या सर्व बाबींबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अन्यथा १ जानेवारी २०२६ रोजी नववर्ष स्वागताच्या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व कुर्डूवाडी प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने देण्यात आला आहे.

 

यावेळी सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे माऊली पवार, सकल मराठा समाज करमाळाचे सचिन काळे, दादासाहेब तनपुरे, दीपक गायकवाड, उमेश काळे, पांडुरंग साळुंखे आदी मराठा बांधव उपस्थित होते.


कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाकडून जाणीवपूर्वक मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुणबी दाखले मिळण्यात त्रास दिला जात आहे. याबाबत लवकरच करमाळा येथे मोठे जनआंदोलन उभे करणार आहोत.

— सचिन काळे, मराठा समन्वयक व तालुकाध्यक्ष, मराठा सेवा संघ.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close