
प्रतिनिधी l अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण धोक्यात आले असून, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उंदरगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज मगर यांनी केले. उंदरगाव येथे तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन केंद्र बांधकामाचे उदघाटन नुकतेच त्यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोकरे, जिल्हा कक्षचे सचिन सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी यशवंत कुदळे, सी.आर.सी. उमेश येळवणे, पवन पतंगे, कैलास भिसे, तुकाराम पाटील, मोनिका लठ्ठे, कमल लठ्ठे, गिरीजा कांबळे, अनिता कांबळे, मिना लठ्ठे, रत्नमाला लठ्ठे, सागर कुंभार आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)-२ अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सहकार्याने हे प्लास्टिक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे. गावातील शाश्वत स्वच्छतेकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असून, या केंद्राच्या माध्यमातून प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. हे केंद्र आदर्श स्वरूपाचे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी यशवंत कुदळे यांनी दिली.
आजच्या काळात प्लास्टिकचा वाढता वापर आणि चुकीच्या विल्हेवाटीमुळे ग्रामीण भागातील पर्यावरण धोक्यात आले आहे. शेती, ओढे, नद्या आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचत असल्याने गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-२ अंतर्गत प्लास्टिक व्यवस्थापन केंद्रे उभारली जात आहेत. योग्य व्यवस्थापनाद्वारे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर किंवा सुरक्षित विल्हेवाट लावल्यास ग्रामीण भागातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
– अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जि.प. सोलापूर.



