
प्रतिनिधी l ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर हिसरे पंचायत समिती गण सर्वसाधारण ठरल्याने या गणात चुरस वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांचे चिरंजीव, युवासेना तालुकाप्रमुख समाधान उर्फ शंभूराजे फरतडे यांनी या गणातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या नव्याने तयार झालेल्या गणातील बहुतांश गावे जुणीच असली तरी मागील निवडणुकीत या गणाचे प्रतिनिधित्व माजी सभापती अतुल पाटील यांनी केले होते. फरतडे पिता-पुत्र यांनी नेहमीच या भागातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. वीज बंद काळातील वीजबिल माफी, टंचाई काळात दोन तास वीज उपलब्ध करणे, कुकडीचे पाणी सिना-कोळगाव धरणात सोडण्याची मागणी, आठ तासांचा वीजपुरवठा, आवाटी सबस्टेशन पूर्णत्वास नेणे, हिसरे पुलाची उंची वाढवणे यांसारख्या विषयांवर त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
या भागातील अनेक प्रश्नांवर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी गप्प असताना, फरतडे पिता-पुत्रांनी एकाकी संघर्ष करत लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. पराभव व अवहेलना झाली तरी त्यांनी जनसेवेचा वसा कायम ठेवला आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, नेत्रतपासणी शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी सतत लोकांशी संपर्क ठेवला आहे.
हिसरे गणातून निवडणूक लढवण्याविषयी शंभूराजे फरतडे यांना विचारले असता त्यांनी माय मराठी न्यूजशी सांगितले की, “मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. मला शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्गाचे प्रश्न जवळून माहित आहेत. ही निवडणूक माझ्यासाठी सत्तेची नव्हे, तर सर्वसामान्यांचा आवाज बनण्याची लढाई आहे. शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवले जावेत, हीच माझी प्राथमिकता असेल. हार-जीत माझ्यासाठी गौण असून लोकांचा विश्वास मिळवणे हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवून, सामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने हिसरे गणातील प्रत्येकाचा आवाज बनण्याचा माझा प्रयत्न असेल.
निवडणूकीनंतर सामान्य नागरिकांना कोणच वाली नसतो त्यांची छोटी- छोटी कामे सुद्धा नडवली जातात, त्यांच्या पर्यंत कोणत्याच शासकीय योजना पोहोचत नाहीत. उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले, रेशनकार्डवर नाव वाढवणे अथवा कमी करणे, रेशनकार्ड विभक्त करणे, अंत्योदय योजने अंतर्गत धान्य मिळवणे यासाठी पैसे मोजून सुद्धा सहा- सहा महिने हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे या सामान्य लोकांचा आवाज बनूण लढण्यासाठी सामान्य माणसांच्या आशिर्वादाने मी लढाई लढणार आहे.




