
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी चिखलठाण जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी, अशी मागणी बागल गटाचे समर्थक व चिखलठाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय सरडे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात ते स्वतः दिग्विजय बागल तसेच गटातील वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार करमाळा तालुक्यातील सहा गटांपैकी पाच गट महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत, तर चिखलठाण हा एकमेव सर्वसाधारण (खुला) गट आहे. या गटात स्वर्गीय दिगंबररावजी बागल (मामा) यांच्या विचारांना मानणारे अनेक मतदार आहेत. तसेच माजी आमदार शामलताई बागल यांच्या कार्यकाळात या मतदारसंघात अनेक विकासकामे झालेली आहेत.
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल आणि दिग्विजय बागल यांचा स्थानिकांमध्ये दांडगा लोकसंपर्क असून त्यांना मानणारा मोठा मतदार या भागात आहे. त्यामुळे दिग्विजय बागल यांनी चिखलठाण जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली तर त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपसरपंच अक्षय सरडे यांनी व्यक्त केला आहे.



