आदिनाथ कारखान्याचा लिलाव होणे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी शेतकर्यांचा केलेला विश्वासघातच- ॲड. अजित विघ्ने

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदीर म्हणून ओळख असलेल्या श्री. आदिनाथ साखर कारखान्याचा एनसीडिसी मार्फत लिलाव होतोय याबाबतची नोटीस पाहुन मन सुन्न झाले. सहा महिन्यांपूर्वी आदिनाथच्या निवडणुकीत सत्ताधारी पाटील गटासह मोहीते पाटील गटाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सारख्या अभ्यासु नेतृत्वाने निवडणुक काळात केलेल्या प्रत्येक वक्तव्याचा आज प्रत्यय येताना दिसतोय. सत्ताधारी लोकांची सत्ता आल्यास सहा महिन्यातच कारखान्याचा लिलाव काढतील. हे मामांचे शब्द आज खरे ठरत आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुक्याचे प्रवक्ते एड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील जनतेने खुप विश्वासाने दिलेल्या सत्तेचा गैरवापर चालु झालेला आहे. आदिनाथ कारखाना पुर्ण क्षमतेने चालवुन दाखविणारे नेते आता कुठे गेले? मोहीते पाटील यांनी माजी आमदार संजयमामांना सत्तेतुन बाहेर ठेवायचे म्हणुन पाटील व जगतापांची युती घडवुन आणली याशिवाय बागल गटानेही चुकीचे निर्णय घेतले जे आज आदिनाथ कारखान्याच्या लिलाव प्रक्रीयेपर्यंत घेऊन आले आहेत. आदिनाथ कारखान्याला कर्जाचे खाईतुन बाहेर काढुन पुर्वपदावर आणणारी आणि सोन्याचा धुर काढु म्हणणारी वक्तव्ये आता हवेतच विरली आहेत. आदिनाथ कारखान्याचे मालमत्तेचा लिलाव एनसीडिसी आणि सत्ताधाऱ्यांकडुन होत आहे हे सत्ताधारी पाटील गटाचे अपयश असुन शेतकरी सभासंदाचा यामुळे विश्वासघात केल्याची भावना सर्वसामान्य आज बोलत आहेत.
माजी आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली असती तर त्यांनी अनुभव आणि महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पाठबळाने नक्कीच आदिनाथ कारखान्याला पुर्वपदावर आणले असते. याबाबतचा सखोल अभ्यास व नियोजन संजय मामांकडे होते त्यांनी निवडणूक कालावधीत प्रत्येक सभा मधून ते मांडले होते आणि याविषयी त्यांनी अजितदादा पवार यांची भेटही घेतलेली होती.परंतु नारायण पाटील – जगताप – मोहिते पाटील – बागल ही अभद्र युती करून सत्ताधारी मंडळींनी फक्त संजयमामांना सत्तेतुन बाहेर ठेवायचे म्हणुन जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविलेले आहे. आदिनाथ साखर कारखाना वाचविण्यासाठी अकलुजला मिटींग घेणारे मोहिते पाटील आदिनाथची सत्ता आल्यावर मात्र आदिनाथला कसे वाचवायचे याबाबत अवाक्षर काढत नाहीत. मात्र आदिनाथचा विषय अलगद बाजुला करून आदिनाथचे विद्यमान व्हाइस चेअरमन महेंद्र पाटील यांचे घरी मिटींग घेऊन आदिनाथ कसा वाचवायचा, कसा चालु करायचा याबाबत अवाक्षरही न बोलता उजनीचे पाण्यावर मिटींग घेतात. आदिनाथ कारखान्याचा विषय बाजुला करण्यासाठी उजनीच्या पाण्याचा विषय पुढे करून अजुन जनता जनार्दनाना फसविण्याचे काम सत्ताधारी मंडळींकडून चालु आहे अशी स्पष्ट शब्दात ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



