-->
करमाळा

ई-पॉस मशिनची डोकेदुखी; करमाळा तालुक्यातील शासकीय धान्य वितरण व्यवस्था कोलमडली!

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

पुरवठा विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी राज्यशासनाने बायोमॅट्रीक म्हणजे ई-पॉस मशीन आणल्या. परंतू याच ई-पॉस मशीन लाभार्थ्यासहीत रेशनदुकानदारांनाही डोकेदुखी ठरत आहेत. ऑनलाईन प्रणाली बदलण्याचे काम सुरू असून ते अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे ई-पॉस मशीन सतत बंद पडत आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील शासकीय अन्नधान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

 

 

ई-पॉस मशीन बंद पडत असल्याने गेल्या दोन महिन्यापासून अनेक रेशन दुकानात माल पडून आहे व गोरगरीब लाभार्थी रेशन दुकानदाराच्या समोर तासनतास रांगा लावून बसून कंटाळून रिकाम्या हाताने माघारी जात आहेत. त्यामुळे रेशनदुकानदारही वैतागले असून गोरगरीब जनतेची ससेहोलपट सुरू आहे. संपूर्ण राज्यभरात ही परिस्थिती असल्याची चर्चा असून यासाठी अनेक सामाजिक संघटना व रेशनदुकानदार संघटना शेकडोने निवेदन दिले आहेत. तरी देखील शासना-कडून याबाबत गांभीर्याने उपाययोजना होताना दिसून येत नाहीत.

 

याबाबत माहिती घेतली असता, पुरवठा विभागाच्या राज्यस्तरावरील सर्व्हरशी ग्रामीण भागातील रेशनदुकाने जोडण्यात आली होती. काही दिवस ही प्रणाली सुरळीत चालली परंतू गेल्या तीन महिन्यापासून राज्य सरकारने पुरवठा विभागाच्या एटीपीडीएस (आधार इनेबल पब्लीक डीस्ट्रीब्युशन सिस्टीम) या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहे. हे सॉफ्टवेअर अगोदर हैद्राबाद येथील कंपनीमार्फत चालू होते. ते आता दिल्ली येथील कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. हैद्राबाद आणि दिल्लीच्या कंपनीमध्ये रेशनदुकाने आणि रेशन कार्डधारक यांचा डाटा आदान-प्रदान होत आहे. त्यामुळे सातत्याने सर्व्हर डाऊन होऊन ई-पॉस मशीन बंद पडल्याने धान्य वितरण करण्यात अडथळा येत असल्याचे समजत आहे.

ई-पॉस मशीनच्या प्रॉब्लेममुळे धान्य वाटपात अडथळा येत आहे. तात्काळ या प्रणालीची दुरूस्ती करून अन्नधान्य वितरण सुरळीत करावे, अशी मागणी रेशनकार्ड लाभार्थ्यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close