ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखांची मदत द्या– शाहूराव फरतडे यांची मागणी

प्रतिनिधी | ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील सलग मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, पिके आणि जनजीवनाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
फरतडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. आता सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सिना नदीच्या पुरामुळे केळी, भाजीपाला, खरिप पिके व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शासनाने पंचनाम्याच्या निकषाशिवाय तात्काळ मदतीचा हात द्यावा, मे महिन्यातील अवकाळी पावसाचे अनुदान तत्काळ वितरित करावे, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दोन लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी फरतडे यांनी केली आहे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, ॲड. विकास जरांडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, शहर प्रमुख समीर हलवाई, उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे, शाखाप्रमुख ओंकार कोठारे, विजय माने, प्रमोद वागज, अजय साखरे, मयूर तावरे, भाऊराव मस्तुद, विश्वास पाटील, दिगंबर काटुळे, ज्ञानेश्वर लोंढे, बालाजी वाडेकर, उत्तम हनपुडे, अविनाश गाडे, शिवाजी नाईकनवरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.



