करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


इफको कंपनीच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेला नॅनो लिक्विड युरियामुळे युरिया टंचाईवर मात करण्यास मदत मिळेल असा आशावाद फलोत्पादन सहसंचालक माणिकराव त्र्यंबके यांनी व्यक्त केला आहे.

नॅनो युरिया वितरण शुभारंभप्रसंगी पंढरपूर विभाग कृषी विकास अधिकारी सर्जेराव तळेकर, तंत्र अधिकारी प्रशांत बिनवडे, करमाळा तालुका कृषी अधिकारी देवराव जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी शंकर मिरगणे उपस्थित होते. यावेळी नॅनो युरियाची माहिती देताना इफको कंपनीचे जिल्हा विक्री अधिकारी रवींद्र मोरे म्हणाले की, सध्या बाजारात युरियाची प्रचंड टंचाई आहे यावर मात करण्यासाठी इफको या शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या सहकारी कंपनीने प्रदीर्घ संशोधन करून नॅनो युरियाची निर्मिती केली आहे. ५०० मिली च्या बाटली मधून ४५ किलो पोते जेवढी पिकाला ताकद देते किंवा पिकाची उत्पादनक्षमता वाढवते तेवढी ताकद पिकांना ५०० मिली नॅनो युरिया मधून मिळते. एक एकर क्षेत्रासाठी ५०० मिली नॅनो युरियाची फवारणी भरपूर होते. संशोधित केलेल्या नॅनो युरियाची नक्कल काही कंपन्या बाजारात करत असल्याचे दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी या बाटलीवर इफको कंपनीचा लोगो बघूनच बाटली खरेदी करावी.
यावेळी महेश ऍग्रो एजन्सी चे संचालक महेश चिवटे यांनी नॅनो युरिया याबद्दल माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक खत विक्री दुकानात नॅनो युरिया इफको कंपनी उपलब्ध करून देणार असून शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खत विक्रेत्यांकडे नॅनो युरिया अशी मागणी नोंदवावी असे आवाहन रवींद्र मोरे यांनी कंपनीच्या वतीने केले आहे.



