दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लवकरच सुरू होणार; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा/प्रतिनिधी


यावर्षी करमाळा तालुक्यात पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन लवकरात लवकर सुरू व्हावे, या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू असून दोन ते तीन दिवसात कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू होईल. अशी माहिती करमाळा-माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
उजनी धरण आज ३२ टक्के भरल्याच्या पार्श्वभूमीवरती बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्या कारणामुळे विशेष बाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करावे. अशी आग्रही मागणी आपण यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली होती. धरणातील अल्प पाणीसाठा पाहता वरिष्ठ पातळीवर पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे पाणी सोडता आले नाही. परंतु, गेल्या ८ दिवसात उजनी धरण कार्यक्षेत्रात विशेषता पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरण ३२ टक्के पेक्षा अधिक भरलेले आहे. त्यामुळे खरीप आवर्तन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
उजनी धरण १३ टक्के असताना विशेष बाब म्हणून दहिगाव चे आवर्तन सुरू करणे संदर्भात आ. शिंदे यांनी केली होती आग्रही मागणी
यावर्षी उजनी धरण मे महिन्याच्या प्रारंभीच उणे पातळीमध्ये गेल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना ६ मे २०२३ च्या आसपास बंद पडली होती. या पावसाळ्यामध्ये ४ महिने उलटून गेले तरी अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पट्ट्यातील हंगामी पिकांबरोबरच केळी, ऊस यासारख्या बारमाही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे उजनी धरण अद्याप ३३ टक्के भरलेले नसले तरीही दुष्काळी परिस्थितीचा विचार करता विशेष बाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे. अशी आग्रही मागणी आ. शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदनाद्वारे केली होती.
‘या’ गावांसाठी आवर्तन सुरू होणे अत्यंत गरजेचे
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावरती सौंदे, सरापडोह, शेलगाव क, साडे, निंभोरे, घोटी, गुळसडी, वरकटणे, कोंढेज, देवळाली, खडकेवाडी, फिसरे, अर्जुननगर, हिसरे, सालसे, आळसुंदे आदी गावातील असंख्य शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केलेली आहे. केळी पिकाचा खर्च लाखोंच्या घरात आल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होणे अत्यावश्यक आहे.




