भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त करमाळ्यात अभिवादन

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारे भारतरत्न, थोर राष्ट्रपुरुष स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजयजी घोरपडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नगरसेवक रामभाऊ ढाणे, नगरसेवक दीपक चव्हाण, गणेश महाडिक, संताजी घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संजय घोरपडे हे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्यावर बोलताना म्हणाले की, अटलजी हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते संवेदनशील कवी, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या भावना ओळखणारे लोकनेते होते. पक्षनिष्ठा राखत देशहित सर्वोच्च मानणारे त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहेत, असे त्यांनी सांगितले. अटलजींच्या विचारांवर चालत करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित नगरसेवक रामभाऊ ढाणे व दीपक चव्हाण यांचा श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. अटलजींच्या आदर्शावर कार्य करत पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा संकल्प दोन्ही नगरसेवकांनी व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रभक्तीची भावना, अटलजींच्या आठवणी आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा यामुळे वातावरण भावूक झाले होते. “अटलजी त्यांच्या विचारांमुळे सदैव अमर राहतील” अशा भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमातून अटल बिहारी वाजपेयी यांचे राष्ट्रप्रेम, विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.




