केम प्रतिनिधी/


करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील सरपंच विद्याताई शिवाजीराव सरडे यांनी अतिशय कौतुकास्पद कार्य केले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात प्रथम स्वतः चे सरपंच पदाचे मानधन त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपुर तालुक्यात अतिवृष्टी मुळे सावित्री नदीला आलेला महापूर आणि दरडी कोसळल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. पूराचे पाणी जरी कमी झाले असले तरी संसार पाण्याखाली बुडून गेल्याने नागरिकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न कायम आहे. या नागरिकांना उभारी देण्यासाठी करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील सरपंच विद्याताई शिवाजीराव सरडे यांनी आपले सरपंच पदाचे आतापर्यंत चे मानधन १२००० रूपये पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार समीर माने यांचेकडे सरपंच प्रतिनिधी शिवाजी सरडे यांनी हा मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील, माजी सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बिभिषण आवटे, पंचायत समिती सदस्य गणेश चौधरी, तलाठी उमेश बनसोडे, हिवरे माजी सरपंच बाबासाहेब पवार, उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय शिंदे, धनाजी माने, आण्णा कांबळे आदी उपस्थित होते.



