-->
करमाळाकृषी विषयकमाहिती विषयक

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा; कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे आवाहन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

केन्द्र शासन प्रणित, आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना येत्या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतमाल प्रक्रिया आणि कृषी पूरक व्यवसाय यांचेसाठी ही योजना आणली आहे. करमाळा तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करमाळा तालुक्याचे कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे साहेब यांनी केले आहे. कृषी अधिकारी कार्यालय, करमाळा यांच्यावतीने लाभार्थी अर्ज सादरीकरण भव्य असा महिला मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला १४० महीला बचतगट, कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

 

या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. ही योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यावर आधारित असून, जिल्ह्याकरिता ज्वारी उत्पादन निवडण्यात आले आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळींशी जोडणी व त्याद्वारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे. योजना बँक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के व कमाल १० लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे. मार्केटिंग व ब्रँडिंगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५०% अनुदान देय आहे. लाभार्थी, इच्छूक लाभार्थी, चालू स्थितीतील अन्न प्रक्रिया, उद्योगातील कुशल कामगार, एसएचजी, एफपीओ, एफपीसी व को-ऑपरेटिव्ह मधील सदस्यांना मोफत जिल्हास्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणा दरम्यान ज्वारी केक, ज्वारी बिस्कीट, कुकीज, ज्वारी लाडू, ज्वारी इडली, ज्वारी चकली, ज्वारी शेवया, ज्वारी पोहे, ज्वारी पिझ्झा बेस असे विविध ज्वारीपासूनचे दहा ते बारा प्रक्रिया पदार्थ प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले जातात.

 

“एक जिल्हा एक उत्पादन” या योजने अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारी हे पीक निवडण्यात आले आहे. ज्वारीवर नवीन प्रक्रिया उद्योग उभारल्यास या योजनेतून अनुदान मिळते. ज्वारी व्यतिरिक्त इतर कार्यरत प्रक्रिया उद्योग असेल तर त्याच्या विस्तारीकरण, स्तरवृध्दी आणि आधुनिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. वैयक्तिक लाभार्थी, गट संस्था, सहाय्यता गट, शेतकरी उत्पादन कंपनी, संस्था उत्पादक, सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.” या योजने सबंधी अर्ज करण्यासाठी श्री. मनोज बोबडे (मो.क्र. ९८८१६५१०१२) यांच्याशी संपर्क साधावा किंवा कृषी विभाग कार्यालय, करमाळा येथे संपर्क साधावा.

श्री.समाधान खूपसे पाटील, प्रशिक्षण समन्वयक (PMFME) राज्यस्तरिय तांत्रिक संस्था, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये कार्यरत समूहांना ग्रामसंघामार्फत उपजीविका निधी ६०,०००/- पर्यंत देण्यात येतो. या निधीचा उपयोग हा स्वयंसहायता समूहातील सदस्यांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी करावा हा उद्देश आहे. या छोटया प्रमाणात उभारलेल्या व्यवसायांना PMFME अंतर्गत निधी मिळवून मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसहायता समूहांनी व्यवसाय निर्माण करावेत. महाराष्ट्र शासनाने सन २०२२-२३ हे उपजीविका वर्ष म्हणून घोषित केले असल्याने या कालावधीत PMFME योजनेचा लाभातून जास्तीत जास्त उद्योग उभारावेत.

श्री. योगेश जगताप, तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) पंचायत समिती, करमाळा

 

एक जिल्हा एक उत्पादनामध्ये केला बदल

▪️पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात ज्वारीजन्य पदार्थाच्या प्रक्रिया उद्योगासाठी बॅंकांकडून भांडवल देण्यात येते. मात्र, आता योजनेचे निकर्ष बदलेले असल्याने कोणत्याही जिल्ह्यात कोणतेही फळ किंवा अन्नधान्य पदार्थापासून उत्पादने तयार करण्यासाठी भांडवल मिळणार आहे. यामध्ये ज्वारीजन्य पदार्थ, सागरी उत्पादने, नाचणी, भगर, चिकू, आंबा, केळी, कांदा, टोमॅटो, दूध, गहू, द्राक्ष, गुळ, मका, मोसंबी, सीताफळ, पेरू, हरभरा, तूर, मूग, हळद, मिरची, संत्रा, सोयाबीन, जवस, भात आदिंचा या प्रक्रिया उद्योगामध्येे सामावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन ही कृषी प्रक्रिया उद्योगाबाबतची एक चांगली योजना आहे. शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतमालावर वर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकता. त्यातून शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल. त्यामुळे या योजनेचा युवकांनी व महिलांनी त्या प्रमाणात लाभ घ्यावा. यामध्ये उद्योगाला ३५% सबसिडीची तरतूद कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे.

▪️श्री. मनोज बोबडे, जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन व्यक्ती (PMFME), कृषी विभाग करमाळा

या महिला मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे साहेब, श्री देवराव चव्हाण कृषी अधिकारी, श्री मनोज बोबडे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन व्यक्ती (PMFME), कृषी पर्यवेक्षक डी. एम. गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी श्री. डी.एस. चौधरी, श्री. आर.सी. बनसोडे, श्री. ए.एस. चव्हाण, श्री. योगेश जगताप (उमेद), श्री. अजय बागल साहेब, मंगेश भांडवलकर (DRP), श्री. सत्यम झिंजाडे, श्री. पोलके साहेब, श्री. उमाकांत जाधव साहेब, रोहिणी सरडे मॅडम, श्री. मारकड साहेब, श्री. पोळ, श्री. गोरवे, इतर कर्मचारी, उद्योजक व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी योजनेतील लाभार्थीचे अर्ज सादरीकरण, त्रुटी पूर्तता, प्रकल्प अहवाल, योजनेची व्याप्ती यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार श्री. मनोज बोबडे यांनी मानले. सदर कार्यक्रम पंचायत समिती सभागृह, करमाळा येथे पार पडला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close