प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे घेऊन अत्यंत चांगला त्यातून मार्ग काढतील उद्धव साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.
करमाळा एसटी डेपो ४० कर्मचारी रुजू झाले असून या वाहक चालकांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करमाळा एसटी डेपो मध्ये करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मयुर यादव, उपशहर प्रमुख संतोष गांगुर्डे, करण काळे, सोहम पठाण, शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कामावर रुजू होऊन वाहक म्हणून काम करणारे प्रकाश कोपनर व चालक दीपक भारती यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे म्हणाले की, उद्धव साहेब ठाकरे हे संवेदनशील नेतृत्व असून ते एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व मागण्या मान्य करणार यात कोणतीही शंका नाही. राज्य शासनात विलीनीकरणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा जो निकाल येईल त्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल. एसटी बंद असल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली असून गोरगरिबांची प्रचंड अडवणूक होत आहे. याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक वाले घेत आहेत. वयोवृद्ध, विद्यार्थी, आजारपणासाठी ये-जा करणारे रुग्ण यांचे एसटी बंद असल्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन केले.
४० कर्मचारी कामावर रुजू झाले असून एसटीच्या आठ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावे. स्वतःच्या बरोबर सर्वसामान्य प्रवाशांचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा. एसटी वाचली तर आपण सर्व वाचणार आहोत. याचा विचारही कामगारांनी करावा व सर्वांनी कामावर यावे.
आश्विनी किर्दात
एसटी आगार प्रमुख, करमाळा




