शेतीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करा- शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांची मागणी

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे तोडलले वीज कनेक्शन तात्काळ जोडा अशी आग्रही मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी केली आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की, सध्या शेतकऱ्यांचे उस गाळपास पाठवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. अतिरिक्त उस असल्याने एकरी १० ते १५ हजार मोजून उस कारखान्याला घालवावा लागत आहे. अजून बऱ्याच साखर कारखान्याकडे गाळपास गेलेल्या उसबिलाची पहिली उचल मिळालेली नाही. अशा परिस्थितीत शेतीपंपाच्या वीज बीलाची वसुली करण्यासाठी महावितरण ने वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत तीन महिने बिल भरण्यास मुदतवाढ दिली असून तात्काळ शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश आहेत.
विधीमंडळात सुरु असलेल्या अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत पुढील तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचे आदेश उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
करमाळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी महावितरणने शेतकऱ्यांची रोहित्र सोडवुन ठेवली आहेत. सध्या उसतोड सुरु असलेल्याने अनेक ऊस तोडणी मजूर तालुक्यात आहेत. वाड्यावस्त्यावर उतरलेल्या या मजुरांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे. तसेच तोडलेल्या उसाचा फुटवा होण्यासाठी लगेच ऊसाला पाणी देणे गरजेचे असते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार तात्काळ खंडित केलेला शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा. शेतकऱ्यांमध्ये अगोदरच नाराजी असताना महाविकास आघाडी सरकारच्या या शेतकरी हिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कुचराई केली तर शिवसेनेच्या वतीने कर्तव्य चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री, उर्जा मंत्री यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असा इशारा शाहुराव फरतडे यांनी दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती करमाळा व जेऊर येथील महावितरण च्या अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.




