-->
करमाळा

बाजारपेठेवर निर्बंध घातल्यास जेल भरो आंदोलन करू; करमाळा व्यापारी संघटनेचा इशारा

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

१३ ऑगस्ट पासून करमाळा तालुक्यातील व्यापाऱ्यांवर तसेच बाजारावर टाकलेले निर्बंध उठून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित आंदोलनात असोसिएशनचे सदस्य महेश चिवटे यांनी दिला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे पप्पू शेठ सिंधी, दिनेश शेठ घोलप, जगदीश आग्रवाल, अशोक शेठ दोशी, हरिभाऊ कोकाटे, मिलिंद देवी, गजराज चिवटे, दीपक चव्हाण आधी व्यापारी उपस्थित होते.

 

सुभाष चौक, करमाळा येथे झालेल्या आंदोलनात बोलताना महेश चिवटे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून वाढलेला खर्च, दुकानाचे भाडे, कर्जाऊ रक्कम चे व्याज, कर्मचाऱ्यांच्या पगारी, घरपट्टी, लाईट बिल, जीएसटी असे अनेक इतर खर्च यामुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. राज्य शासन व केंद्र शासनाने कोणतीही मदत व्यापाऱ्यांना दिली नाही. केवळ काही झालं तरी व्यापाऱ्याला फास द्यायचा ही शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलायला हवी. फ्रन्टलाइन वर्कर म्हणून प्रत्येक शॉप ॲक्ट लायसन धारक व्यापार्‍याला प्राधान्याने लस देणे गरजेचे असताना कोणत्याही प्रकारे व्यापाऱ्यांचा विचार केला गेला नाही. लाखो रुपयांचा दंड व्यापाऱ्यांकडून वसूल केला. आता संपूर्ण पुणे जिल्हा निर्बंध मुक्त झालेला आहे मात्र, सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. करमाळा शहरात आज एकही कोरोना रुग्ण निघालेला नाही. करमाळा शहर पूर्ण कोरोना मुक्त असताना बाजारपेठ बंद ठेवणे योग्य नाही. ग्रामीण भागातील ज्या गावात रुग्ण संख्या जास्त आहेत ती गावे बंद करावीत. चार-पाच गावासाठी संपूर्ण करमाळा तालुका बंद करू नये. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कोणताही निर्णय घेताना किंवा व्यापार्‍यावर निर्बंध घालताना व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली जात नाहीत. व्यापार्‍याच्या व या व्यापारावर अवलंबून असलेल्या हजारो मजूर, कामगार या सर्वांचा विचार घेऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. १३ ऑगस्ट नंतर प्रशासनाने बाजारपेठ बंद ठेवण्याचा प्रयत्न केला तर व्यापारी संघटना हा निर्णय मान्य करणार नाही. वेळप्रसंगी तुरुंगात जाऊ, जेलभरो आंदोलन करू पण दुकाने बंद ठेवणार नाही. बंद ठेवायचे असेल तर आमची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. अशी मागणी महेश चिवटे यांनी केली.

 

यावेळी जगदीश अग्रवाल, गणेश चिवटे, हरिभाऊ कोकाटे, दीपक चव्हाण, पप्पू शेठ शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आज प्रथमच व्यापारी रस्त्यावर आक्रमक पणे उतरल्यामुळे शहरात एक चर्चेचा विषय झाला होता.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close