एकनाथ शिंदे यांनी शब्द केला खरा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना ९.२७ कोटीची मदत; जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


मे २०२४ मध्ये करमाळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे व वादळामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी. अशी मागणी आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४७७३ केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी २७ लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया करमाळा तहसील कार्यालय मार्फत सुरू आहे. अशी माहिती शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यासह ४८ तासात पंचनामे पूर्ण करून माहिती शासनास सादर केली होती. तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी गवसने याचा सातत्याने पाठपुरावा जिल्हाप्रमुख चिवटे यांनी केला होता. करमाळा तालुक्यातील विशेषतः उमरड, सोगाव, चिकलठाण, वांगीसह नुकसान झालेल्या ईतर गावांतील ४७७३ केळी उत्पादक शेतकऱ्यांचे शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले होते.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मशेलकर यांनी या नुकसान झालेल्या केळी पिकाची प्रत्यक्षात शेतावर जाऊन पाहणी करून तेथूनच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल केला होता. नुकसान झालेले केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, उमरड येथील प्रमोद बदे, दत्तू गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहे.
मे २०२४ मध्ये वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या केळी जमिनीवर लोळल्या होत्या. यावेळी तात्काळ पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळत आहे याचे समाधान आहे.
श्री. संजय वाकडे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी.



