करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली असून ७५ व्या वर्षांमध्ये भारत देश पदार्पण करीत आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील १००० कुटुंबांना “घर घर तिरंगा, मन मन तिरंगा” या अभियाना अंतर्गत भारतमातेच्या प्रतिमा देण्यात आल्या. तसेच करमाळा तालुक्यातील ५०० हून अधिक कुटुंबांमध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील २० हून अधिक गावांमध्ये भारतमातेच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये भारतमातेचे पूजन व्हावे. अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची धारणा आहे.

यावेळी कोरोना काळामध्ये करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येऊ नयेत. याची काळजी घेत समाजहिताची भूमिका ठेवणारे करमाळ्याचे मा. तहसीलदार समीर माने यांचा “कोविड योद्धा” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच करमाळ्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. डूकरे यांचा ही सन्मान करण्यात आला. वैद्यकिय सेवा देणारे डॉ. लोकरे व करमाळा तालुक्यात प्रथम कोविड सेंटर उभा करणारे संतोष वारे यांचाही “कोविड योद्धा” म्हणून सन्मान करण्यात आला. ढोकरी – भिवरवाडी च्या पंचक्रोशीमध्ये आपल्या कार्य कर्तृत्वामुळे सर्वांचे आवडीचे असणारे ढोकरी जि. प. प्रा. शाळेचे आदर्श शिक्षक स्व. रविंद्र साळुंखे यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना भारत मातेची प्रतिमा देण्यात आली. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. भिवरवाडीचे माजी सैनिक भास्कर आर्किले, वांगीचे माजी सैनिक महाडिक, देविदास देशमुख आदी सैनिकांचा भारतमातेची प्रतिमा देऊन अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जिल्हासहसंयोजक शुभम बंडगर, तालुका प्रमुख संतोष कांबळे यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी रामराजे डोलारे, बाबासाहेब चौगले, राहूल गडदे, प्रदीप वाघमोडे, आशिष बंडगर, गणेश पाटील, सागर लोखंडे, माऊली साबळे, सुरेश वाघमारे, हर्षद पाटील, सुमित मस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



