प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


महाराष्ट्र शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार हायमास्ट दिवे बसवू नये, असे आदेश ०८ डिसेंबर २०२१ रोजी पारित झाले आहेत. मात्र ०८ डिसेंबर २०२१ पर्यंत मंजूर झालेले हायमास्ट दिवे बसवावेत, अशी मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यातील जवळपास ७० गावात चालू आर्थिक वर्षात ८० लाख रूपये किंमतीचे हायमास्ट दिवे मंजूर झालेले आहेत. या दिव्यांच्या मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. असे असताना अचानक मंजूर झालेले हायमास्ट दिवे रद्द करणे चुकीचे ठरत आहे.
त्यामुळे शासनाने ०८ डिसेंबर पूर्वी मंजूर झालेले सर्व दिवे बसवण्यासाठी सुधारित अध्यादेश काढावा. अशी मागणी लेखी पत्राद्वारे आ. संजयमामा शिंदे यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील असून वर्षानुवर्षे वाड्यावस्तीवर राहणारे ग्रामीण भागातले लोक अंधारात राहत आहेत. त्यांच्या वस्त्या प्रकाशमान करण्याची वेळ आलेली असताना, एका निर्णयाने सर्व ग्रामीण भागातल्या वस्त्या पुन्हा अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा विचार करून निदान मंजूर झालेल्या व निधी वर्ग झालेल्या कामांना वगळून नवीन अध्यादेश काढावा. अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे.



