दहिगाव योजनेच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; पाणी तर नाहीच पण पाणीपट्टी भरण्याच्या शेतकऱ्यांना नोटीस

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या २४ गावातील शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाकडून सुरू असून २०२५ च्या उन्हाळी आवर्तनाचे पाणी योजना चालू होऊन महिना होत आला तरी अद्याप टेल भागामध्ये पोहोचलेले नसताना शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी अशा नोटिसा पोस्टाने शेतकऱ्यांना आलेल्या आहेत. यामुळे शेतकरी हबकून गेलेत. एक तर उभी पिके पाण्यावाचून जळून गेलेले आहेत.
पाण्यासाठी आंदोलने करण्याचा इशारा देऊनही पाणी आलेलं नाही. दि. ७ एप्रिल रोजी होणारे रास्ता रोकोचे आंदोलन पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेले होते परंतु संबंधित शेतकऱ्यांची घर फसवणूक लोकप्रतिनिधीने केले असून पाणी दिलेच नाही. त्यामुळे नाईलाजाने उद्या दि. १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला असताना त्या पार्श्वभूमीवर या नोटीस आल्यामुळे पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधी संबंधित आंदोलन दडपण्यासाठी तर हे नोटिसीचे शस्त्र वापरत नसतील ना अशी शंका आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे.
काय आहे नोटीस ?
संबंधित नोटीसीमध्ये असे म्हटले आहे की, दहिगाव उपसा सिंचन योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरील तक्त्यात दर्शविलेल्या हंगामाची पाणीपट्टी रक्कम रुपये ———– याप्रमाणे मागील थकबाकीवरील जादा आकारासह खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे तुमच्याकडून येणे आहे. सदर रक्कम महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या कलम ८८ प्रमाणे नोटीस प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसाच्या आत उपविभागीय कार्यालय कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. १२ येथे भरणे आवश्यक आहे. जर ही रक्कम वरील मुदतीत भरली नाही तर आपणास थकबाकीदार म्हणून यापुढील पाणीपुरवठा मंजूर केला जाणार नाही. त्याशिवाय पाणीपट्टीच्या थकीत रकमेवर १० टक्के ज्यादा आकार वसूल करण्यात येईल तसेच थकित रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १७६ मध्ये विनिर्देष्ट केलेल्या पद्धतीने सक्तीच्या उपायाने वसूल करण्यात येईल.




