-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

लोकांची धुणी धुण्यापेक्षा प्रवक्त्यांनी कारखाना कसा चालवणार? यावर प्रवचन द्यावे; ॲड. अजित विघ्ने यांचा पाटील गटाला मार्मिक टोला 

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला कर्जातुन मुक्त करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी आमदार संजयमामा यांचे सक्षम नेतृत्व हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे हे आता सभासदांनी ओळखले आहे. त्यामुळे गर्भगळीत झालेल्या प्रवक्त्यांनी नेहमीप्रमाणे दिशाहीन वक्तव्ये सुरू केलेली आहेत. ज्यांना साधा खाजगी आणि सहकारी कारखाना यातला फरकच कळत नाही त्यांनी संजयमामांवर टिका काय करावी ? १७ तारखेच्या निवडणुकीत सभासद संजय मामांना कौल देणार असून कारखान्यावरती मामांची निर्विवादपणे सत्ता येणार आहे. त्यावेळेस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आम्ही करू. लोकांची धुणी धुण्यापेक्षा प्रवक्त्यांनी त्यामध्ये प्रवचन द्यावे. असा मार्मिक टोला संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांच्या टीकेला उत्तर देताना लगावला आहे.

 

याविषयी सविस्तर बोलताना ते म्हणाले की, मागील काळात आ. नारायण पाटील यांनी कारखान्याच्या चिमणीतून सोन्याचा धूर काढण्याची घोषणा केली होती. ती घोषणा पण हवेत विरली आणि तो धूर पण हवेत विरला. सोन्याचा धूर काढणं दूरच परंतु शेतकरी, कामगार यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आणि त्याचा धूर मात्र आता कारखाना परिसरात दरवळू लागला आहे. याउलट संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशनने १५ वर्षात ३६ गावे आणि माढा तालुक्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका निभावली आहे याबद्दल तिथले शेतकरी समाधानी आहेत. विद्यमान आमदारांना मामांची या क्षेत्रात बरोबरी करण्यासाठी नक्कीच पुढचा जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तरी त्यांना ते शक्य होईल असे वाटत नाही. शुगर, को जनरेशन, टेक्सटाईल, बॉटलिंग आदी युनिटच्या माध्यमातून त्यांनी म्हैसगावच्या माळावरती नंदनवन केलेले आहे. नारायण पाटलांनी फक्त या शब्दांचे अर्थ सांगावेत व कोणत्या युनिट मधून काय बाहेर येते एवढे जाहीरपणे सांगावे आणि मगच संजयमामा वरती टीका करावी. नारायण पाटलांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत साधी एक पिठाची चक्की काढता आली नाही. त्यांना आदिनाथच्या ३०००० सभासदांच्या जीवनाशी खेळण्याचा व त्यासाठी पॅनल उभा करण्याचा नैतिक अधिकारच नाही, मत मागणं तर दूरची गोष्ट आहे. असा हल्लाबोल ॲड. अजित विघ्ने यांनी केला आहे.

 

स्वर्गीय गोविंदबापू हयात असताना कारखान्याला चांगले दिवस आणून आपल्या वडिलांचे अपुरे राहिलेले स्वप्न नारायण पाटील पूर्ण करू शकले असते परंतु ते त्यांना करणं जमलं नाही. हिऱ्याच्या पोटी केरसुणी जन्मली. या उलट पितृत्वाचे छत्र लहानपणातच हरपलेले असतानाही मोठ्या भावाच्या साथीने देशात सगळ्यात कमी वेळात संजयमामांनी विठ्ठल शुगर उभा केला. १५ वर्षे जिल्ह्यात खाजगी कारखान्यात सर्वात जास्त दर हा केवळ विठ्ठल कार्पोरेशनचाच होता ही गोष्ट त्यांच्या नेतृत्वाचा मोठेपणा अधोरेखित करते. आज देखील कोणत्याही शेतकऱ्याचा एक रुपया या कारखान्याकडे थकीत नाही. परंतु सद्यस्थितीत ज्या अकलूजकरांचे एजंट म्हणून आमदारसाहेब तालुक्यात वावरत आहेत त्या अकलूजकरांनी २ कारखाने विकल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांची थकीत बिले आणि शेअर्स अजून देखील त्यांनी दिलेले नाहीत. हाच अकलूजचा भकास पॅटर्न नारायण पाटलांना करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्यात राबवायचा आहे त्यासाठीच प्रवक्ते आदिनाथ कारखान्याच्या भवितव्याविषयी न बोलता विषयांतर करत आहेत. कारण त्यांच्याकडे कारखाना चालू करण्याचे कोणतेच व्हिजन नाही हे दिसून येते असा आरोप विघ्ने यांनी केला आहे.

 

संस्था कशी बळकवावी ? संस्थापकाला आत्महत्येला कसे प्रवृत्त करावे ? ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार कसा करावा ? वाळू तस्करी कशी करावी ? कंत्राटदारांकडून खंडणी कशी वसूल करावी ? दहिगाव योजनेचे पाईप कसे जाळावेत ? कारखान्याच्या चिमणीतून सोन्याचा धूर कसा काढावा ? शेतकरी कामगार यांच्या स्वप्नांची राख रांगोळी कशी करावी ? या जेऊर पॅटर्न वरती प्रवक्त्यांनी प्रवचने द्यावीत, कीर्तने करावीत व लोकांमध्ये जनजागृती करावी, ही खरी काळाची गरज आहे. असा उपरोधिक सल्ला अजित विघ्ने यांनी शेवटी दिला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close