-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

दहीगाव योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करावी; आ. नारायण पाटील यांची जलसंपदामंत्री विखे- पाटील यांच्याकडे मागणी

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी सर्वेक्षणासह निधी उपलब्ध करून द्यावा. अशी आग्रही मागणी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे केली आहे.

 

करमाळा तालुक्यातील महत्वाकांक्षी दहीगाव उपसा सिंचन योजना प्रकल्पाची चाचणी दि. १० मे २०१८ रोजी झालेली आहे. सदर योजनेमध्ये करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी २४ गावे समाविष्ट असून १०५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेवर २८९.९४ कोटी खर्च झालेला आहे. ही योजना उत्तमरित्या चालविण्यासाठी व महाराष्ट्रातील वीज बिला अभावी बंद पडलेले इतर प्रकल्प लक्षात घेता दहीगाव सिंचन योजना सौर उर्जेवर चालविण्यात यावी. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा प्रकल्प कार्यक्षेत्रातच असून सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम उजनी धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादीत करण्यात आलेल्या तथापी महत्तम संचय पातळीच्यावर असलेल्या जागेत करता येणे शक्य आहे. त्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना हा प्रकल्प सौर उर्जेवर चालविण्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी किंवा मेढा योजनेमधून करण्यासाठी सर्वेक्षण व प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत व सदर योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.

 

दहीगाव उपसा सिंचन योजना टप्पा क्र १ व टप्पा क्र. २ कार्यान्वीत झालेली असून सदर योजनेमध्ये नियोजित २४ गावातील १०५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. परंतु पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मुख्य कालवा अस्तरीकरण व भूसंपादनाची कामे होणे आवश्यक आहे. तरी यासाठी रक्कम रुपये १५ कोटीची निधी देण्यात यावा. अशीही मागणी यावेळी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close