-->
आरोग्यकरमाळाराजकिय

उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत लवकरच रुग्णांच्या सेवेत; मा.आ. संजयमामा शिंदे यांनी केली कामाची पाहणी

अधिकारी व कर्मचारी वसाहतीचे कामही प्रगतीपथावर...

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

२०१९ ते २०२४ या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकास कामांसाठी आणलेला होता. त्या पैकी करमाळा उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम करणे व अधिकारी कर्मचारी वसाहत बांधकाम करणे या २ कामांसाठी तब्बल ४३ कोटी निधी त्यांनी मंजूर करून आणला होता. ही दोन्हीही कामे आता पूर्णत्वाकडे आलेली आहेत. लवकरच त्याचे लोकार्पण होणार असून या कामाची पाहणी आज शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली.

 

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्याच्या दृष्टीने आरोग्य क्षेत्रातील हे अतिशय महत्त्वाचे काम आहे.

 

या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संकीर्ण प्रशामा- २०२१/प्रक्र-१३१/आ-अ, दि. ०१ जुलै २०२१ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली तर तांत्रिक मान्यता पत्र क्र. जा.क्रं. मुअपु/का-२/इमा-१/९५४/२०२२ दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मिळाली. तसेच ओंकार कन्स्ट्रकशन, पुणे यांना कार्यारंभ आदेश जाक्र/साबाविअ/निविदा/३७३६/सन २०२२ दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी मिळाला. हे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु ते पूर्ण झाले नाही.


अशी असेल उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत

सदर इमारत ही तळमजला आणि इतर दोन मजले अशी आहे. एकूण ७३२०.२१ चौमी बांधकामाचे क्षेत्रफळ आहे. यामध्ये बेसमेन्ट मजल्यावरती वाहनतळ, ऑक्सीजन सिलेडर स्टोअर असणार आहे. तळ मजल्यावर तपासणी केंद्र, एलडीआर-1 आणि एलडीआर-2, विलगीकरण कक्ष, (Isolation ward), एचडीयू, चाइल्ड ओपीडी, एएनसी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, टॉयलेट प्रस्तावीत आहेत. पहिल्या मजल्यावर पीएनसी वॉर्ड, पेडियात्रिक वॉर्ड, आयसीयू, फिमेल सर्जिकल वॉर्ड, फिमेल मेडिकल वॉर्ड, डायालिसीस सेंटर असणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर मेल सर्जिकल वॉर्ड, मेल मेडिकल वॉर्ड, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स रूम, संगणक रुम असणार आहेत. याशिवाय भूमिगत पाण्याची टाकी, सेप्टीक Tank, रेनवाटर हार्वेस्टिंग, भूविकास (पार्कस आणि गार्डन), अंतर्गत रस्ते संरक्षक भिंत, गेट व विद्युत विषयी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत या कामावर १७३३.६७ लक्ष खर्च झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून दरवाजे, खिडक्या व रंगकाम सध्या बाकी आहे. हे काम पूर्ण झाले की इमारत रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close