केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील मौजे पाथुर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माझी वसुधंरा’ या अभियानाला ग्रामसेवक महेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात झाली आहे. या अभियानांतर्गत पाथुर्डी येथे “दर रविवारी एक तास गावांसाठी” हा उपक्रम राबविला जात आहे. या मध्ये वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान अथवा ईतर कोणतेही सार्वजनिक कार्य व श्रमदान असेल त्यासाठी गावातील इच्छुक ग्रामस्थांच्या मदतीने दर रविवारी श्रमदान करायचे ठरविले आहे.

रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी बाळू मामा मंदिर परिसरात वृक्ष लागवडीसाठी एकूण पंचवीस खड्डे खोदले आणि श्रमदानातून वृक्ष लागवड केली. झाडे लावल्याच्या ठिकाणी संरक्षणासाठी जाळया बसविण्याचे कामही पूर्ण केले. याला आधार देण्यासाठी काटेरी झुडपाची आवश्यकता होती म्हणून सरपंच प्रतिनिधी तथा चेअरमन संतोष मोटे यांनी स्वतः दिवसभर श्रमदान करून काटेरी बाभळीची झाडे व झुडपे यांची व्यवस्था केली. या कार्यक्रमासाठी निसर्गप्रेमी, गावातील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी ग्रामसेवक महेश काळे म्हणाले कि, झाडे ही निसर्गाची पंच महाभुते म्हणजे अग्णी, जल, वायु आकाश व माती यांचा समन्वय साधण्याचे कार्य करत असतात. मानवी शरीर ही पंच महाभुतापासून बनलेले आहे. यामुळे झाडे ही मनुष्य जीवनाचा आधार आहे. झाडाशिवाय मनुष्य राहू शकत नाही. यामुळे झाडे वाचवण्यासाठी मदत करा. कारण, झाडे वाचली तरच आपण वाचणार असे त्यांनी सांगीतले. या श्रमदानासाठी उपस्थितांचे आभार ग्रामसेवक श्री. काळे यांनी मानले.



