-->
आरोग्यकरमाळासामाजिक

करमाळा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे; प्रा. रामदास झोळ यांचे आवाहन

 

माय मराठी न्यूज 

 

स्वच्छता ही आरोग्याची जननी असून करमाळा शहर व तालुक्यातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन करमाळा शहर स्वच्छ व सुंदर करून आरोग्य संपन्न जीवन जगावे. असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. ते प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दि. २३ जुलै रोजी करमाळा बस स्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या करमाळा शहर स्वच्छता मोहिम प्रसंगी बोलत होते.

 

करमाळा आगारातील बंद पडणाऱ्या एसटी बाबत व त्यामुळे होणाऱ्या गैरसौयीबाबत आगार प्रमुखाशी चर्चा करून यावर उपाय योजना करण्यासाठी प्रा. झोळ यांनी बस स्थानकाला भेट दिल्यानंतर बस स्थानक परिसरात प्रचंड अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीमुळे बस स्थानकात रोगराईचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने २३ जुलै रोजी स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

 

या स्वच्छता मोहिमेत करमाळा बस स्थानकाचे आगार प्रमुख विरेंद्र होनराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा नेते गणेश मंगवडे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुहास काळे पाटील, भाग्यश्री गरड मॅडम, प्रा. राजेश गायकवाड, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष गफूर शेख, काँग्रेस आयचे उपाध्यक्ष आनंद झोळ या सर्वांनी सहभागी होऊन संत गाडगे बाबांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र अवलंबून हाती झाडू घेऊन करमाळा बस स्थानक व परिसराची स्वच्छता केली. याचबरोबर रोगराई पसरू नये म्हणून जंतुनाशक पावडर ही टाकण्यात आली.

 

करमाळा बस स्थानक स्वच्छतेबाबत प्रा. रामदास झोळ सर व त्यांच्या पत्नी सौ. मायाताई झोळ मॅडम यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सर्व सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांबरोबर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविल्याबद्दल प्रवासी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमाला व कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच बस स्थानक स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल प्रा. रामदास झोळ सर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, सौ. मायाताई झोळ मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचा आगारप्रमुख विरेंद्र होनराव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

आजच्या युगामध्ये प्रत्येक जण व्यवस्था व सुविधांबाबत तक्रार करतो, पण जबाबदार नागरिक या नात्याने आपण आपले कर्तव्य बजावतो का याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. करमाळा बसस्थानक परिसर स्वच्छतेचे हे अभियान दर रविवारी सुरू राहणार असून करमाळा शहरातील सुजाण नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन करमाळा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.

प्रा. रामदास झोळ सर, अध्यक्ष, दत्तकला शिक्षण संस्था. संस्थापक, प्रा. रामदास झोळ फाउंडेशन

 

करमाळा शहर व बसस्थानक स्वच्छतेचा संकल्प प्रा. रामदास झोळ सर यांनी केला आहे. करमाळा बस स्थानक स्वच्छतेचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद असून आमच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम त्यांनी केले आहे. प्रशासनाकडून स्वच्छतेचे टेंडर दिलेल्या व्यक्तीला सक्त ताकीद देऊन करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ राखण्यास सांगितले असून यापुढे योग्य व्यक्तीला स्वच्छतेचे टेंडर देण्यासाठी प्रा.झोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिफारस करणार आहे. प्रशासनाच्या वतीने करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.

श्री. विरेंद्र होनराव, करमाळा, आगार व्यवस्थापक.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close