सुरू असलेल्या रब्बी आवर्तनात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे ५ हजार हेक्टर क्षेत्र वंचितच- रणजित देवकर
१० पंपाचे पाणी गेले कुठे? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल...

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


दहिगाव उपसा सिंचन योजनेवरून सध्या तालुक्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून दहिगाव योजनेचे बंद पाडलेले काम व पाईप जळीत प्रकरणात केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर देताना आमदार नारायण पाटील गटाकडून शेतकरी आता या पाठीमागील आवर्तने व आत्ता सुरू असलेले रब्बी आवर्तन यांची तुलना करिता असून शेतकरी या आवर्तनावरती समाधानी आहेत व यापूर्वी कधीही न चालवलेले १० पंप या आवर्तनात आपण चालू केले आहेत त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी माजी आमदार शिंदे गटाकडून आरोप केले जात आहेत असा प्रतिवाद पाटील गटाकडून करण्यात आला होता. शिंदे गट आणि पाटील गट यांच्याकडून केले जात असलेले दावे प्रतिदावे यांच्या पलीकडील वस्तुस्थिती धक्कादायक आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे १०५०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत असून त्यामध्ये सालसे १९३ हेक्टर, आळसुंदे २०२ हेक्टर, लव्हे ६४३ हेक्टर, पांडे ४०८ हेक्टर, फिसरे ३०५ हेक्टर, हिसरे १२७ हेक्टर या गावांना रब्बी आवर्तनाचे पाणी मिळालेच नाही. तर साडे गावाचे १६८९ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येत असून त्यापैकी फक्त सरकारी तलावाला पाणी दिलेले आहे. तेली तलाव, भागूटे तलाव, ओड्यावरील बंधारे अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे कोंढेज या तलावावरती वरकटणे आणि कोंढेज ही दोन गावे अवलंबून आहेत, या दोन गावांचे (कोंढेज ५०२ हेक्टर, वरकटणे ७९२ हेक्टर) जवळपास १३०० हेक्टर क्षेत्र योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये असतानाही हा तलाव अद्यापही वंचित आहे. पांडे गाव व म्हसेवाडी तलाव, लव्हे येथील विठोबा तलाव, सालसे, आळसुंदे व नेरले या गावांचा पाणी प्रश्न अवलंबून असलेला नेरले तलाव, फिसरे येथील ढवळे तलाव, शेलगाव च्या ओढ्यावरील अर्जुननगर व हिसरे हद्दीतील बंधारे या आवर्तनामध्ये वंचितच राहिलेले आहेत. पाटील गटाकडून १० पंपांचा बोलबाला केला जात असताना या १० पंपाचे पाणी नेमके मुरले कुठे ? ५० दिवस आवर्तन चालू असतानाही ५००० हेक्टर लाभक्षेत्रामध्ये असणाऱ्या गावांच्या हद्दीत पाणी का पोहोचले नाही? हा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.
जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाही
कोंढेंज तलाव हा तालुक्यातील दोन नंबरचा मोठा तलाव आहे. हा तलाव माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात कोणताही राजकीय गट तट न पाहता २ वेळेस ओव्हर फ्लो केला होता. असे असतानाही या रब्बी आवर्तनामध्ये जाणीवपूर्वक या तलावाला पाणी दिलेले नाही. वरकटणे व कोंढेज या दोन गावांचा पाणी प्रश्न या तलावातील पाण्यामुळे मिटत असतो. लोकप्रतिनिधींनी राजकीय आकस मनात न ठेवता किमान उन्हाळी आवर्तनाचे पाणी तरी आम्हाला द्यावे ही विनंती.
– रणजीत देवकर, वरकटणे, ग्रामस्थ.




