प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


विकासापासून वंचित असलेल्या करमाळा तालुक्याला भरीव निधी खेचून आणण्यात आमदार संजयमामा शिंदे यांना यश येत असून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात करमाळा तालुक्याला १०० कोटीहून अधिक निधी मंजूर झालेला असून करमाळा तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे व निकडीचे प्रश्न या माध्यमातून सुटले जाणार आहेत.
राज्यमार्ग क्रमांक २०२ कुर्डूवाडी – माढा- यावली या रस्त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये १९ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हा रस्ता सोलापूरला जाण्यासाठी पर्यायी व कमी अंतर असलेला रस्ता आहे. जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा ३ ला जोडणारा रस्ता प्रजिमा १९० मध्ये मोठा पूल (डिकसळ पूल) बांधण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तालुक्याच्या रस्ते विकासासाठी एकूण ६९ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. तसेच कुर्डूवाडी येथील ट्रामा केअर युनिट बांधकाम करण्यासाठी ७ कोटी २३ लाख व करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थान बांधकामासाठी १८ कोटी ६८ लाख यामध्ये आरोग्यविषयक सुविधा याबाबतीत करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथील ५० बेडचे श्रेनीवर्धन करून १०० बेड रुग्णालय बांधकाम करण्याकरिता २५ कोटी रुपये निधीची तरतूद केलेली आहे. अशी ५१ कोटी रुपयांची तरतूद आरोग्यविषयक सुविधांसाठी करण्यात आलेली आहे.
त्यामुळे २०२१ चे हिवाळी अधिवेशन करमाळा तालुक्यासाठी खूप काही देणारे ठरले आहे. आमदार शिंदे यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यापूर्वीही आमदार शिंदे यांच्या माध्यमातून विज समस्यावरती तोडगा म्हणून आवाटी येथे नव्याने उभारण्यात येत असलेले सबस्टेशन तसेच कोर्टी सबस्टेशन मधील क्षमतावाढ या कारणांमुळे विजेचा प्रश्न सुटण्याससही मदत होणार आहे. एकूणच २०२१ हे वर्ष संपत असताना आमदार शिंदे यांनी मंत्रालयीन स्तरावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या पाठबळामुळे आपली ताकद दाखवून देऊन करमाळा तालुक्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यामध्ये यश मिळवलेले आहे.




