दहिगाव उपसा सिंचन योजना बंदनलिका वितरण प्रणाली कामाचा उद्या भूमिपूजन समारंभ
आ. संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व माजी आ. जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन उद्या मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन योजना ही १९९६ साली मंजूर झालेली योजना होती. या योजनेची चारी आणि उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्रातील जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून वंचित होते. या वंचित असलेल्या क्षेत्राला दहिगाव योजनेच्या पाण्याचा लाभ मिळावा. यासाठी आपण दहिगाव उपसा सिंचन योजनेची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली. त्यानंतर २०२० पासून २०२३ पर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास १०९ कोटी निधीची तरतूद दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी केल्यामुळे दहिगाव योजनेच्या २७ वितरिका, ९९ उपवितरीका व १९ थेट विमचक यांची अपूर्ण असलेली कामे केली जाणार आहेत.
या सर्वच कामांचे १०१.३४ कोटी कामांची निविदा आपण काढली असून सदर काम द इंडियन ह्युम पाईप कं लिमिटेड मुंबई या कंपनीला मिळाले आहे. योजनेची अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर १० हजार ८०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर दहिगाव योजनेला मंजूर असलेल्या १.८१ टीएमसी पैकी ०.४६ टीएमसी पाण्याची बचती होणार आहे. त्याचा फायदा योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर गावांना पाणी देण्यासाठी होणार आहे.
सदर योजनेच्या या कामाचे भूमिपूजन उद्या ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी योजनेच्या लाभ क्षेत्रातील जेऊरवाडी, कुंभेज, खडकेवाडी, गुळसडी, देवळाली, पांडे, अर्जुननगर, हिसरे, शेलगाव (क), फिसरे, सरपडोह, सौंदे, सालसे, आळसुंदे, साडे, वरकटणे, कोंढेज, जेऊर, शेलगाव वांगी, लव्हे, निंभोरे, घोटी, वरकुटे, भाळवणी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



