-->
करमाळाराजकिय

विविध विकास कामांसाठी भाजपाच्या रश्मी बागल यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

करमाळा तालुक्यातील जेऊर मध्य रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत लवकरच निश्चितपणे कार्यवाही होईल अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका मा. रश्मी दिदी बागल यांनी आज मुंबई येथून बोलताना दिली. यावेळी सोलापूर जिल्हा भाजपा युवा नेते दिग्विजय बागल, लोकमंगल उद्योग समूहाचे रोहन देशमुख, मकाईचे संचालक आशिष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी अधिक माहिती देताना बागल म्हणाल्या की, जेऊर हे सोलापूर रेल्वे विभागातील मध्य रेल्वेचे महत्त्वाचे व सोयीस्कर रेल्वे स्टेशन आहे. करमाळा तालुकाच नाही तर आसपासच्या इतर तालुक्यांमधूनही प्रवासी या रेल्वे स्टेशन वरून पुणे, मुंबई, दौंड, इंदोर, अहमदनगर, बेंगलुरु, चेन्नई, तिरुपती बालाजी यांसह आदी ठिकाणी शासकीय कामे, दैनंदिन कामे, दवाखाना, शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी व प्रवासी रोज ये जा करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी व त्यांची अनेक दिवसाची मागणी लक्षात घेऊन जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना थांबा देण्याबाबतचे पत्र मा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले असून त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना पत्र देऊन याबाबत निश्चितपणे लवकरच कार्यवाही करू असे सांगितले आहे.

 

यासोबतच करमाळा तालुक्यातील मांगी, कोर्टी, बिटरगाव, सांगवी, रामवाडी, खातगाव, केम, हिवरवाडी, साेगाव (पूर्व), वाशिंबे, कावळवाडी, आळसुंदे, पिंपळवाडी, वीट, भिवरवाडी, गुलमरवाडी, वडगाव (उत्तर) अशा १७ गावातील विविध विकास कामांना त्यामधील सिमेंट काँक्रिटीकरणचे रस्ते, गावांमधील विद्युत डीपी, बौद्ध विहार, रस्ते डांबरीकरण, २५/१५ मधील रस्त्यांची कामे आदी विविध विकासकामांबाबत या गावांच्या कामांचा प्राधान्याने येत्या ३ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तातडीने समावेश करावा. असा आदेश थेट पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना रश्मी बागल यांच्यासमोरच दिला. त्यामुळे याही गावांची कामे मार्गी लागतील व त्याकरिता भरीव आर्थिक तरतूद होईल. असा विश्वास रश्मी बागल यांनी यावेळी व्यक्त केला.

 

त्याचबरोबर करमाळा बस आगारांमध्ये जुन्या बस या वारंवार नादुरुस्त होतात, व प्रवासात मध्येच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो व त्यांचा वेळ वाया जातो. याबाबत प्रवाशांच्या अनेकदा तक्रारी येत होत्या त्याबाबतही करमाळा आगारांमध्ये तातडीने नवीन बसेस लवकरात लवकर मिळतील व त्या ताबडतोब द्याव्यात असा थेट आदेश सोलापूरचे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक यांना स्वतः पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुंबई येथे जवळपास एक तासभर करमाळा तालुक्यातील विविध कामांच्या मागण्यांबाबतची अनेक निवेदने मागण्या व विनंती पत्रे रश्मी दिदी बागल यांनी मंत्री महोदयांना सादर केली. यावर सखोल चर्चा होऊन सकारात्मक कार्यवाही सर्व कामांबाबत होईल. असा आत्मविश्वास शेवटी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी यावेळी व्यक्त केला.

 

आज राज्यासह पुणे, मुंबईत शहरात मुसळधार पाऊस चालू असतानाही करमाळा तालुक्याच्या विकास कामांसाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका मा. रश्मी बागल, भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल, संचालक आशिष गायकवाड हे वेळेवर पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले होते. भर पावसातही करमाळा तालुक्याच्या विकास कामाप्रती असलेली तळमळ व घेतलेली मंजुरी याबद्दल तालुक्यातील नागरिक रश्मी बागल यांना धन्यवाद देत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close