-->
करमाळाविशेष

मांगीतील बिबट्याच्या वावराला वन विभागाकडून पुष्टी; कार्यवाही न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त

फुकटचे सल्ले नको कार्यवाही करा; परिसरातील नागरिकांचे आवाहन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

मांगी येथील शेतकरी आनंद बागल यांच्या शेतामध्ये काल (शुक्रवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आला होता. ही घटना प्रत्यक्षदर्शी प्रीतम माळी यांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रीत केली व वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर आज शनिवार ( दि.५ जुलै ) रोजी मांगी येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन ठशांचे निरीक्षण केले व या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले.

 

यावेळी वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके व निरीक्षक सुरेश कुरले यांनी मांगी, पोथरे परिसरातील नागरिकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले. मात्र नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली असता याबाबत वरिष्ठांना अहवाल दिला जाईल व खबरदारी म्हणून येथे कॅमेरा बसवून नियंत्रणासाठी काही कर्मचारी ठेवले जाणार असल्याचे सांगितले.

 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न करता वेळ मारून नेल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला फुकटच्या सल्ल्याची नव्हे तर कार्यवाहीची गरज आहे. जीवित हानी झाल्यावरच वन विभागाला जाग येईल का? खरंच बिबट्यापासून माणसाला धोका नाही तर याची जबाबदारी वनविभाग घेणार का? ज्या भागात बिबट्याचा वावर आहे तिथेच त्याला पकडण्याची कार्यवाही का केली जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 

परिसरात बिबट्याची दहशत कायम

गेल्या १५-२० दिवसापासून बिबट्याचा वावर जातेगांव, पोथरे, मांगी परिसरात जाणवत आहे. काल पोथरे मांगी परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील गावात एकच खळबळ उडाली आहे. लोकांना शेतीची कामे करण्यासाठी शेतात जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे. मात्र, वन विभाग बिबट्याला जेरबंद करण्याचे सोडून लोकांना सतर्क राहण्याचा फुकटचा सल्ला देऊन मनुष्यहानी होण्याची वाट पाहत आहे का?

नितीन झिंजाडे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख, करमाळा

 

वन विभागाचे मात्र दुर्लक्षच

तालुक्यातील याअगोदर घडलेल्या घटनांचा विचार करून वन विभागाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने पिंजरा लावून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे.

सुजित बागल

सामाजिक कार्यकर्ते, मांगी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close