आदिनाथ कारखान्यात उत्पादित झालेल्या पहिल्या साखरेतून आदिनाथ महाराजाला महाप्रसादाचा भंडारा
बचाव समितीने संकल्प पूर्ती निमित्ताने केला आनंद उत्सव साजरा; मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत या दोघांचे बचाव समितीने मानले आभार

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामतीच्या तावडीतून सोडून तो पुन्हा करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मालकीचा व्हावा. या मागणीसाठी आदिनाथ बचाव समितीची पहिली बैठक आदिनाथ महाराजांच्या मंदिरात संगोबा येथे झाली होती. यावेळी आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी आदिनाथ कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिल्यानंतर उत्पादित झालेल्या पहिल्या साखरेचा नैवेद्य आदिनाथ महाराजाला असा संकल्प सोडला होता. याप्रमाणे आज संकल्प पूर्ती करण्यात आली.
यावेळी बचाव समितीचे निमंत्रक तथा साहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश (दादा) चिवटे, आदिनाथ चे माजी संचालक डॉ. वसंत पुंडे, संतोष पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, हरी दादा झानपुरे, बाबुराव नेटके, शारंगधर खाडे सर, मिसाळ मेजर, राजाराम डांगे, माणिक बोंबाळे, बाबा साबळे महाराज, ज्योतीराम डांगे, संतोष निर्मळ, मुख्याध्यापक सुनील शिंदे सर, पत्रकार राजेंद्र गायकवाड, नागेश चेंडगे, विनय ननवरे आदी जण तसेच आदिनाथ बचाव समितीचे सभासद उपस्थित होते.
आदिनाथ साखर कारखान्यातून निर्माण झालेल्या पहिल्या साखरेच्या पोत्यातून आदिनाथ महाराजांच्या मंदिरात शिरा बनवून महाप्रसाद म्हणून उपस्थित सर्वांना वाटण्यात आला.
तुमच्या पुतण्यापासून आमचा आदिनाथ वाचवा अशी आर्त हाक या आदिनाथच्या मंदिरातूनच माजी कृषिमंत्री शरद पवार यांना बचाव समितीने घातली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डिजिटल पुढे उद्धवा अजब तुझे सरकार घोषणापत्र देऊन आदिनाथ कडे शरद पवार व उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधीत करण्याचा प्रयत्न आदिनाथ महाराजांच्या मंदिरातील बैठकीत झाला होता.
आदिनाथ कारखाना बचाव समितीने प्रचंड असा संघर्ष करून हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यात यश मिळवले आहे. आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांनी मनाचा मोठेपणा करून बारा कोटी रुपयांची आर्थिक मदत कारखान्याला केली. हा कारखाना सुरू करण्यात प्रा. तानाजीराव सावंत व प्रा. शिवाजीराव सावंत यांचा सिंहाचा वाटा असून या सावंत बंधूमुळे कारखाना वाचला असा दावा केला. आदिनाथ कारखाना प्रतिदिन चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेने चालू शकतो, अशा पद्धतीचे दुरुस्ती काम झाले आहे. आता शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आदिनाथला मोठ्या प्रमाणावर ऊस घालावा. यावर्षी चांगले गाळप झाले तर येणाऱ्या काळात कारखान्याचे विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प व वीज निर्मिती हे तिन्ही प्रकल्प हाती घेता येऊ शकणार आहे. आदिनाथ चा येणारा काळ उज्वल असून हा सभासदांच्या मालकीचा कारखाना असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.
मा. श्री. हरिदास डांगे, (मा. कार्यकारी संचालक, आदिनाथ कारखाना)




