सातोली येथील गावांतर्गत मुख्य रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे; ठेकेदाराकडून शासनाची फसवणूक
सातोलीच्या ग्रामस्थांबरोबर शासनाची ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून ५ लाखाची फसवणूक; मुख्य रस्त्यासंदर्भात गावकऱ्यांचे पंचायत समिती समोर आंदोलन

-
-
- प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे
-
सातोली (ता. करमाळा) येथे गावातील शाळेकडे आणि गावात जाणारा प्रमुख रस्ता जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर झालेला होता. या रस्त्याच्या कामासाठी ४ लाख ९३ हजार ४३७ एवढा निधी शासनाकडून मंजूर असून या कामाचे टेंडर हे गौरव चांगदेव राखुंडे या ठेकेदार एजेंसी कडे गेले आणि त्यांनी रस्ता केला. रस्त्याचे काम पूर्ण होऊन २१ दिवसाच्या आत रस्ता फुटला आहे. म्हणून याची वेळोवेळी ठेकेदारास गावकऱ्यांनी कल्पना दिली आहे. परंतु मुजोर ठेकेदाराकडून गावकऱ्यांच्या मागणीची कुठलीही दखल घेतली गेली नाही.


फुटलेल्या रस्त्यामुळे तसेच या रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे सातोली ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून शुक्रवार दि. १६ जून रोजी सामूहिक ठिय्या आंदोलनाचे निवेदन संबंधित कार्यालय जिल्हा परिषद बांधकाम विभाग, करमाळा येथे दिले. तसेच या निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय, पंचायत समिती व पोलीस ठाणे, करमाळा यांना दिल्या आहेत.
अशा मुजोर ठेकेदारांमुळे आणि आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे छोट्या गावातील, खेड्यातील ग्रामस्थांची वेळोवेळी फसवणूक केली जात आहे. याला आळा बसण्यासाठी सातोली ग्रामस्थ पंचायत समिती करमाळा येथे आंदोलन करणार असल्याची माहिती तक्रारदार प्रवीण साळुंखे यांनी दिली आहे.
संबधित ठेकेदारा बरोबरच अधिकाऱ्यांची देखीलचौकशी व्हावी.
सरपंच आणि गावकरी यांनी सतत सूचना देऊन देखील ठेकेदाराने काम व्यवस्थित न करता एकाच दिवशी सकाळी चालू केलेले काम पहाटे तीन पर्यंत चालू ठेवले होते. तेथे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे किती सिमेंट, किती खडी, किती सेंड क्रश वापरली याचा ताळमेळ मजुरांना लागला नाही, म्हणून रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्याची चौकशी व्हावी म्हणून या कामाचे कनिष्ठ अभियंता कन्हेरे साहेब आणि जिल्हा परिषदेचे उपअभियंता गौंडरे साहेब यांची देखील चौकशी व्हावी. गावकऱ्यांची एकच भावना आहे की आमचं गाव छोट्या लोकसंख्येचे असल्याने आम्हाला निधी कमी प्रमाणात उपलब्ध होतो आणि तो जर निधी निकृष्ट दर्जाचे काम करून वाया जात असेल तर यात शासनाचे देखील नुकसान आहे.
प्रवीण साळुंखे, अर्जदार
सातोली येथील रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे यात तथ्य नाही. या रस्त्याचे काम पक्के होण्याअगोदरच रस्त्यावरून ट्रॅक्टर सारखे अवजड वाहन गेल्याने रस्ता खराब झाला होता. परंतु, त्याची दुरुस्ती संबंधित कामाच्या ठेकेदाराने केलेली आहे. तसेच उर्वरित ठिकाणी करावयाची राहिलेली दुरुस्ती दोन दिवसात करण्यात येणार आहे.
श्री. कन्हेरे एम. के.
अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग, करमाळा.



