
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा येथील तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात कार्यरत असलेल्या उमरड मंडळ अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याबाबतीत करमाळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून ही कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यामध्ये पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव शाहिदा युनूस काझी (वय ४२) असे आहे.
याबाबात सविस्तर माहिती अशी की, उमरड येथील मंडळ अधिकारी काझी यांनी तक्रारदाराला २५ हजार रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. वारस नोंदीसाठी तक्रारदाराने अर्ज केला असता त्यावर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार रुपये मागितले होते. त्यावर तडजोड होऊन २० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. या संशयीत आरोपीला आज मंगळवार दि. ३० मे रोजी जेऊर येथील मंडळ अधिकारी कार्यालयात लाच साकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईसाठी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षन अधिकारी म्हणून सोलापूर चे पोलिस उपधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिले. तर पोलिस अंमलदार स्वामीराव जाधव, पो. ना. अतुल घाडगे, पो. कॉ. सलीम मुल्ला, शाम सुरवसे आदींनी सापळा लावून ही कारवाई केली आहे.



