‘या’ रेल्वे गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी प्रवासी संघटनेचा मोर्चा; १९९७ पासुनच्या मागणीचा इतिहास काय? वाचा सविस्तर…

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्टेशन व आजुबाजुच्या परिसरातील गावे आणि रेल्वे प्रवाशांची संख्या पाहता दोन एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा मिळाला तर साहजिकच रेल्वे प्रशासनास याचा तोटा न होता फायदाच होईल अशी खात्री आहे. त्यामुळे निदान ट्रायल बेसीसवर तरी येथे दोन गाड्यांना थांबा द्यावा. अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनेची आहे. परंतु रेल्वे प्रशासन फक्त सुपरफास्ट आणि शहरातील प्रवाशांचाच विचार करताना दिसत आहे. सरकार अनेक मार्गांनी सर्वांकडूनच कर वसुली करते मग ग्रामिण आणि शहरी लोकामधे भेदभाव का करते? यासाठी प्रवाशी संघटनेने एकजुट होऊन लढायचे ठरविले असून या भागातील सर्व ग्रामपंचायती कडून ठरावाचे संकलन केले आहे. तसेच सर्व बचत गट, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, शाळा, कॉलेज, व्यापारी, शेतकरी, नोकरदार यांनी शनिवार दि. १८ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता केत्तुर ग्रामपंचायत कार्यालय येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर ११:०० वाजता मोर्चा रेल्वे स्टेशनवर जाऊन निवेदन देण्यात येणार आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन आणि मोठी बाजारपेठ असणारे ठिकाण हे पारेवाडी रेल्वे स्टेशन असुन, उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रामुळे देखील या स्टेशनला विशेष महत्व आहे. सदर रेल्वे स्टेशन हे पुनर्वसित स्टेशन असुन केत्तुर नं-२ गावठाणच्या हद्दीत वसलेले हे स्टेशन आहे. या स्टेशनच्या निर्मिती पुर्वी मध्य रेल्वे च्या जुन्या ट्रकवर पोमलवाडी, कात्रज अशी स्थानके होती. ऊस, केळी, गहु, भाजीपाला या प्रमुख पिकांचे व्यतिरिक्त या भागातील मासेमारी व्यवसाय देखील खुप मोठ्या प्रमाणावर चालतो. या स्टेशन परिसरात ३० ते ३५ गावे असुन राशीन, कोर्टी पासुन चे प्रवासी या ठिकाणाहुन मुंबई, पुणे, सोलापुर, हैदराबाद व अन्य ठिकाणी प्रवास करतात.
सन १९९७ पासून च्या मागणीचा इतिहास....
सन-१९९७ साली कै. माजी आ. रावसाहेब पाटील, कै. माजी जि.प. सदस्य रामकृष्ण रावजी पाटील, ज्येष्ठ नेते श्री. रामराव साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनाने करमाळा शिवसेनेचे तत्कालीन दिवंगत नेते कै. शिवाजीराव मांगले, माजी जि.प. सदस्य शहाजीराजे भोसले आणि परिसरातील तरुण युवक आणि ग्रामस्थांनच्या उपस्थित तसेच नेताजी सुभाष विद्यालयातील १९९७ साली बॅचचे सर्व विद्यार्थी- शिक्षक यांनी हजारोंच्या संख्येने तब्बल ५ तास कर्नाटका एक्सप्रेस अडवुन रेलरोको आंदोलन केले होते. त्यावेळी अनेक ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामधे प्रामुख्याने वरील ज्येष्ठ व्यक्तिंसह उदयसिंह पाटील, सुर्यकांत पाटील, ॲड. अजित विघ्ने, कैलास निसळ, श्रीहरी देवकते, रामहरी जरांडे, देविदास खाटमोडे, सुनील नगरे, कल्याण खाटमोडे, गणपत खाटमोडे पाटील, निवास निसळ, ओमप्रकाश जोशी, नवनाथ राऊत, तुकाराम तात्या खाटमोडे, रोहीदास शिंदे सर, देवराव नवले, भजनदास खाटमोडे, डॉ. दोभाडा, भाजपा नेते प्रशांतशेठ दोभाडा यांचेवर केसेस दाखल झाल्या.
करमाळा आणि दौंडच्या कोर्टात तब्बल पाच- सहा वर्षे सर्वांनी फेऱ्या मारल्या. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणत्याही गाडीला पारेवाडी रेल्वे स्टेशन वर थांबा दिला नाही. तरीही आजपर्यंत निरंतरपणे हा संघर्ष चालुच आहे. अनेक रेल्वे मंत्री बदलले, सरकार बदलले परंतु अजुनही रेल्वे प्रवाशी संघटनेची मागणी पुर्ण होत नाही.
पुणे व सोलापूर येथे जाणे-येणे साठी उपयोगी रेल्वे गाडीचे वेळापत्रक
गाडी क्रं. २२७३१ हैदराबाद ते मुंबई हि पारेवाडी येथे सकाळी ६:४५ वाजता येते व ती पुणे येथे सकाळी ९:३० वाजता पोहोचते. तर गाडी क्रं. २२७३२ मुंबई ते हैद्राबाद हि पुणे येथुन सायं. ६:४५ वाजता निघते व ती पारेवाडी येथे रात्री ८:०० वाजता पोहोचते.
गाडी क्रं. २२१५७ मुंबई ते चेन्नई हि पारेवाडी येथे पहाटे ४:४५ वाजता येते व पुढे सोलापूर येथे सकाळी ७:०० वाजता पोहोचते. तर गाडी क्रं. २२१५८ चेन्नई ते मुंबई हि सोलापूर येथुन रात्री १०:०० वाजता निघते व पारेवाडी येथे मध्यरात्री ११:५० वाजता पोहोचते.
अनेक मान्यवर व राजकीय नेत्यांना वेळोवेळी दिले निवेदन….
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, मा. सुशिलकुमार शिंदे, मा. रामदास आठवले, मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. ममता बॅनर्जी, मा. सुरेश प्रभु, सुरेश कलमाडी, मा. नारणदास राठवा, मा. लालुप्रसाद यादव, मा. बबनदादा शिंदे, मा. प्रणितीताई शिंदे, मा. विजयसिंह मोहिते पाटील, मा. रणजितसिंह मोहिते- पाटील, मा. सुभाष देशमुख, मा. सुप्रियाताई सुळे, विद्यमान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. संजयमामा शिंदे यांसह अन्य मान्यवरांना निवेदने दिली आहेत.
१९९७ पासुन आजपर्यंत प्रत्येक वर्षी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून हा पाठपुरावा करताना गावातील अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रत्यक्ष वेळ देऊन विभागिय रेल्वे व्यवस्थापक (सोलापुर), जनरल मॅनेजर (मुंबई) व रेल्वे मंत्रालय, मुंबई कडे पाठपुरावा केलेला आहे. खा. सुप्रियाताई सुळे यांनी तत्कालिन केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ममता दीदी यांना स्पेशल पत्र लिहुन हॉल्ट देण्याची मागणी केली होती. तसेच जेऊर येथे खा. निंबाळकर साहेबांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी सहा महीने द्या मी पारेवाडी स्टेशनची मागणी पुर्ण करतो असे आश्वासन दिले. तसेच सोलापुर येथे रेल्वे राज्य मंत्री मा. रावसाहेब दानवे यांना माजी खा. सुभाष देशमुख यांचे सहकार्याने मा. सुर्यकांत पाटील, राजेंद्रसिंह ऊर्फ अशोक पाटील, लक्ष्मीकांत पाटील, उदय पाटील, चेअरमन दत्तात्रय कोकणे, राजुशेठ कटारिया, अजित विघ्ने, संजय गोरे (सोलापुर) आदींनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे.



