उजनीची पाणी पातळी अल्प असताना लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी करणे अन्यायकारक- डाॅ. विजय रोकडे

प्रतिनिधी/वाशिंबे


करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे व माढा विधानसभा मतदासंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उजनी धरणातून सीना-माढा, दहीगाव उपसा सिंचन योजना, उजनी कालवा, कंदर बोगदा या योजनेद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ही मागणी उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यावरती अन्याय करणारी आहे. असे मत वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विजय रोकडे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना रोकडे यांनी सांगितले की, पावसाळ्याचा अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तरी उजनी धरणातील पाणी साठा अवघ्या तेरा टक्क्यांवर आहे. मागील वर्षी याच वेळी धरणातील पाणी पातळी शंभर टक्के होती. परंतु सद्यस्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात उजनी लाभ क्षेत्रातील ऊस, केळी सह इतर फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी प्रचंड धास्तावला आहे.
उजनी धरणासाठी येथील शेतकर्यांनी कसदार जमिनी दिल्या, वसलेली गावे प्रकल्पासाठी उठविण्यात आली. परंतू प्रकल्प ग्रस्तांना
विचारात न घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. उजनीच्या पाण्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी दारी आमदार या नात्याने शिंदे यांची आहे. तरीही विद्यमान आमदारांकडूनच दहीगाव उपसा सिंचन योजनेचे नाव पुढे करुन माढा तालुक्यातील गावांना पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे. परंतु कदापिही हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही असे डॉ. रोकडे यांनी शेवटी बोलताना सांगितले.




