प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेचा लाभ शेतकरी उद्योजकांनी घ्यावा- श्री. संजय वाकडे

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


केन्द्र शासन प्रणित, आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना येत्या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतमाल प्रक्रिया आणि कृषी पूरक व्यवसाय यांचेसाठी ही योजना आहे. करमाळा तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे यांनी केले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करमाळा यांच्या वतीने लाभार्थी अर्ज सादरीकरण कार्यशाळा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. ही योजना “एक जिल्हा, एक उत्पादन” यावर आधारित असून, सोलापूर जिल्ह्याकरिता ज्वारी हे उत्पादन निवडण्यात आले आहे. या योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळींशी जोडणी व त्याद्वारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे. योजना बँक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकी करिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के व कमाल १० लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे. मार्केटिंग व ब्रँडिंगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे. लाभार्थी इच्छूक लाभार्थी चालू स्थितीतील अन्न प्रक्रिया उद्योगातील कुशल कामगार, एसएचजी, एफपीओ, एफपीसी व कॉ-ऑपरेटिव्हमधील सदस्यांना मोफत जिल्हास्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान ज्वारी केक, ज्वारी बिस्कीट, कुकीज, ज्वारी लाडू, ज्वारी इडली, ज्वारी चकली, ज्वारी शेवया, ज्वारी पोहे, ज्वारी पिझ्झा, बेस विविध ज्वारीपासूनचे दहा ते बारा प्रक्रिया पदार्थ प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले जातात.
एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारी हे पीक निवडण्यात आले आहे. ज्वारीवर नवीन प्रक्रिया उद्योग उभारल्यास या योजनेतून अनुदान मिळते. ज्वारी व्यतिरिक्त इतर कार्यरत प्रक्रिया उद्योग असेल तर त्याच्या विस्तारीकरण, स्तरवृध्दी आणि आधुनिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. वैयक्तिक लाभार्थी, गट संस्था, सहाय्यता गट, शेतकरी उत्पादन कंपनी, संस्था उत्पादक, सहकारी संस्था या सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
श्री. समाधान खूपसे पाटील, प्रशिक्षण समन्वयक (PMFME) राज्य प्रशिक्षण तांत्रिक संस्था कृषी विज्ञान केंद्र, बारामती
तसेच या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे साहेब, श्री देवराव चव्हाण कृषी अधिकारी, श्री. मनोज म. बोबडे जिल्हा संसाधन व्यक्ती, कृषी पर्यवेक्षक डी. एम गायकवाड, श्री. डी. एस. चौधरी मंडळ कृषी अधिकारी, श्री आर. सी. बनसोडे मंडळ कृषी अधिकारी, श्री. ए. एस. चव्हाण मंडळ कृषी अधिकारी, श्री. अजय बागल साहेब,
मंगेश भांडवलकर, श्री. सत्यम झिंजाडे, श्री. पोलके साहेब
श्री. उमाकांत जाधव साहेब, रोहिणी सरडे मॅडम, श्री. मारकड साहेब इतर कर्मचारी, उद्योजक शेतकरी उपस्थित होते. यावेळी योजनेतील लाभार्थीचे अर्ज सादरीकरण, त्रुटी पूर्तता, प्रकल्प अहवाल, योजनेचा व्याप्ती यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार श्री. मनोज बोबडे यांनी मानले. कार्यक्रम तालुका कृषी कार्यालय करमाळा येथे पार पडला.




