-->
करमाळाराजकियविशेष

आ. संजयमामा शिंदे यांचा गावभेट दौरा सर्वसामान्यांसाठी लाभदायक- ॲड. अजित विघ्ने

सर्वसामान्य नागरिक साधत आहेत आ. संजयमामा शिंदे यांचेशी प्रत्यक्ष संवाद

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन सर्वसामान्यांच्या बरोबर बसुन नागरिकांशी संवाद व्हावा. या हेतुने आमदार संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शनातुन “आमदार आपल्या गावी; विकासकामांवर चर्चा व्हावी” हा कार्यक्रम गावभेट दौर्‍यातुन चालु आहे. कंदर ते वांगी, पारेवाडी ते जिंती- रामवाडी, दिवेगव्हाण ते कावळवाडी असा दौरा नुकताच पार पडला. या दौर्‍यामधे लोक सहभाग घेत असुन विविध वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्नांवर आमदार साहेब व प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांचेबरोबर चर्चा करून रखडलेली कामे मार्गी लावताना दिसत आहेत. या दौऱ्यातुन विज, रस्ते, पाणी या बाबत चर्चा होत असुन बऱ्याच ठिकाणी स्वातंत्र्य काळापासुन स्मशानभुमी, दफनभुमी नाही याचेही प्रश्न समोर आले आहेत.

 

नागरिकांमधुन शेती (पाणंद) रस्त्यासाठी मागणी असल्याचे दिसत असुन, वैयक्तिक स्वरूपाच्या अडी अडचणी मध्ये महसुल विभागाकडील तक्रारी असल्याचे दिसत आहे. रेशनवरील माल व्यवस्थित मिळत नाही. तसेच फक्त अंगठा (थम) उमटला नाही म्हणुन रेशनिंग बंद झाल्याचे तक्रारी भरपुर प्रमाणात आहे. याबाबत ज्या त्या विभागाच्या अधिकार्याना आमदार साहेबांनी तात्काळ सुचना दिलेल्या असुन सार्वजनिक कामे आणि भविष्यकाळात करायची कामे याबाबत आमदार संजयमामांचे पुढील विकासकामांचे व्हीजन काय आहे. याबाबतही चर्चा होत असुन, मागिल कोरोनाचा दोन वर्षाचा काळ, त्यानंतर सरकारची झालेली बदलाबदल त्यामुळे काही रखडलेली कामे, योजना लवकरच मार्गी लागणार आहेत.

 

जनसामान्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी करमाळा, जेऊर, कोर्टी व तालुक्यातील इतर ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामध्ये जास्तीच्या सुविधा दिलेल्या असुन कुकडी, दहीगाव सिंचन प्रकल्पातुन पाणी मिळविण्यास गेल्या तीन साडेतीन वर्षात यश आलेचे दिसुन येत आहे. याबाबत लोकांमधुन समाधान व्यक्त होत आहे. विशेषतः या प्रकल्पातील लोकांच्या शेतजमिनी कॅनाल करीता संपादीत झालेल्या होत्या त्यांनाही त्यांचे संपादनाचे पैसे मिळाल्याचे लोक सांगताना दिसत आहेत. कोर्टी- विहाळ कारखान्या लगत कुकडी कॅनाल चारी व बोगद्याचे काम मार्गी लावल्यामुळे लवकरच सिंचन क्षेत्र वाढणार असुन, सिंचनाचे बाबतीत आ. रोहीत पवार आणि आ. संजयमामा यांनी केलेल्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे. काही गावातुन एस.टी ची सोय व्हावी म्हणुनही मागणी होत आहे. सर्वात महत्वाचे सर्वसामान्य नागरिक या कार्यक्रमातुन आपला दबलेला आवाज झिडकारून आ. संजयमामा शिंदे यांचेशी विविध प्रश्नांवर प्रत्यक्ष संवाद करत आहेत आणि अनेक विकासात्मक प्रश्न हिरिरीने मांडत आहेत. ही बाब करमाळा तालुक्याचे दृष्टीने निश्चित चांगली असुन या गाव भेट दौर्‍यातुन गावागावातील सुशिक्षित तरुण सहभागी होऊन आपल्या गावासाठी विकासाचे प्रश्न उपस्थित करून आपल्या गावाला, परिसराला विकासाचे वाटेवर नेहण्याचे स्वप्न पहात आहे. गावोगावचे अनेक तरुण मुले जी नोकरीचे, उदयोग किंवा व्यवसायाचे निमित्त बाहेरगावी पुणे, मुंबई या ठिकाणी राहतात त्यांनी देखिल गावभेट दौर्‍याला उपस्थिती दाखवली आहे.

 

गाव-भेट दौरा हा फक्त संवाद आणि चर्चा नसुन भविष्य काळात करमाळा तालुक्यात होणाऱ्या भरीव विकासाची नांदी असेल. आ. संजयमामा शिंदे यांनी कोणतीही राजकीय चर्चा न करता, किंवा कोणत्याही विरोधकावर कसलीही टिका टिप्पणी न करता हाती घेतलेला हा कार्यक्रम निश्चितपणे सर्वसामान्यांचे हितासाठी असुन याचे लोकही भरभरून कौतुक करीत आहेत. प्रत्येक गावातील किमान दहा तरी लोक आमदार संजयमांमाचे कायम संपर्कात असतात हेही लोकांचे बोलण्यातुन स्पष्ट होत आहे. एखाद्याने आमदार संजयमामांना डायरेक्ट फोन केला आणि मामांनी तात्काळ उचलता आला नाही तरी मामा परत कॉल करून हितगुज साधतात हे ही लोकांनी आवर्जुन या भेटीत सांगितले. आजची पिढी ग्लोबल होत आहे. शेतीमधेही नवनवीन तंत्रज्ञान राबविण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. कष्टाच्या जीवावर आज सर्वसामान्य शेतकर्यांची मुले शिक्षण घेऊन समृद्ध झाली आहेत. त्यामुळे नवीन पिढीला राजकारणा पेक्षा आणि कुरघोड्या पेक्षा आपल्या गावाचे विकासासाठी योगदान देणाऱ्या आणि निकोप चर्चा करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता होती, ती आवश्यकता आमदार संजयमामांनी भरून काढल्याचे अनेक तरूण बोलत आहेत.

 

विकासकामांची प्रक्रिया ही निरंतरपणे चालणारी प्रक्रीया असुन गावात असणारी शंभर कामे एकाच झटक्यात होणार नाहीत. परंतु टप्याटप्याने एक एक सोई सुविधा निर्माण केल्यास गावे सुजलाम सुफलाम होतील हे नक्की. गावामधे राजकारण विरहीत गट, तट, पक्ष, भेद विसरून गावचे विकासाचे आराखडे तयार व्हावेत आणि या विकासा करीता लागणारी मदत आणि येणाऱ्या अडचणी आमदार संजयमामा शिंदे सोडवतील याबाबत जनसामान्यात विश्वास निर्माण झालेला आहे. आज गावोगावी कधीही एकत्र न येणारी माणसे आमदार संजयमामांचे गाव भेट दौर्‍यावेळी विकासकामांवर चर्चा करताना पहायला मिळत आहेत. ही बाब करमाळा तालुक्याचे दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. एकंदरीत आमदार संजयमामांचा गाव- भेट दौरा सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close