
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जांभळे पॅथॉलॉजी लॅब, करमाळा तसेच करमाळा मेडिकोज गिल्ड व डॉ. दुरंदे हॉस्पिटल, राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील राजुरी येथे ११२ महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
संपूर्ण घर सांभाळत असताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होऊन अनेक आजारांना आमंत्रण मिळते. ४० वर्षापुढील महिलांनी तर ब्लड तपासणी नियमितपणे करायला पाहिजे. ज्यावेळेस घरातील महिला आजारी पडते त्यावेळेस संपूर्ण घरचं एकप्रकारे आजारी पडतं. म्हणून सामाजिक सेवेच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती डॉ. विद्या दुरंदे यांनी दिली.
दि. २७ सप्टेंबर ते दि. ५ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये दररोज सकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत महिलांचे ब्लड सॅम्पल डॉ. दुरंदे हॉस्पिटल, राजुरी येथे घेण्यात आले. यामध्ये महिलांमधील हिमोग्लोबीन, लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर या तपासण्या मोफत करण्यात आल्या. या सर्व तपासण्या डॉ. नीलम निलेश जांभळे MD, पॅथॉलॉजिस्ट यांच्या लॅब मध्ये करण्यात आल्या. राजुरी येथील या शिबिराचे आयोजन डॉ. विद्या अमोल दुरंदे यांनी केले होते.



