-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

आदिनाथसाठी भविष्यात बागल व पाटील गट एकत्र काम करणार- माजी आमदार नारायण पाटील

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

 

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सह. साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी नऊ-दहा कोटी रूपये भरले आहेत. सावंत यांनी हे पैसे भरल्यानेच कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यास संधी मिळाली असुन सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे. आज रविवार दि. २८ राेजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरील आदिनाथ मंदिरात अभिषेक घालून कारखान्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आदिनाथ साखर कारखाना सहकारीच राहीला पाहिजे. यासाठी आपण आदिनाथ महाराजांच्या आशीर्वादाने प्रयत्न केले आणि त्याला यश आले आहे. माझे वडील स्व. गोविंदबापु पाटील व इतर मंडळीचा या कारखान्यासाठी मोठा त्याग आहे. या त्यागाची जाणीव ठेवुनच मी कारखान्यासाठी प्रयत्न केला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे सहकार्य केले आहे. यापुढेही त्याचे सहकार्य राहणार असून हा कारखाना सुरळीत चालण्यासाठी आदिनाथ महाराज योग्य मार्ग दाखवतील अशी मी आशा बाळगून आहे. वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याची एवढी दुरावस्था झालेली असताना देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कारखान्यासाठी नऊ-दहा कोटी रुपये भरले ही फार मोठी गोष्ट आहे. चालू हंगामात कारखाना चालू करून पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

 

यावेळी आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, देवानंद बागल, जयप्रकाश बिले, डाॅ. वसंत पुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. तर साडे येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्ता जाधव यांनी कारखान्यासाठी एक लाख रुपये रोख मदत यावेळी दिली.  

 

आदिनाथ कारखान्यांबाबत आम्हाला व बागल गटाला एकत्र काम करण्याच्या सूचना प्रा. तानाजी सावंत यांनी दिल्या असून याप्रमाणे भविष्यात कारखान्याचे कामकाज केले जाणार आहे. आम्ही आदिनाथ सहकारी ठेवण्यासाठी यशस्वी झालो आहोत. मात्र, आदिनाथ सुरू करण्यासाठी आम्हाला तालुक्यातील सर्व लोकांचे सहकार्य हवे आहे. हे सहकार्य सर्वजण करतील अशी अपेक्षा आहे.

माजी आमदार नारायण पाटील, करमाळा

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close